कोलंबो : चेतेश्वर पुजारा (नाबाद १२८) व अजिंक्य रहाणे (नाबाद १०३) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या २११ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध आजपासून (गुरुवार) प्रारंभ झालेल्या दुसºया कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद ३४४ धावांची मजल मारली.
गेल्या लढतीत शतकी खेळी करणारा पुजारा आज ५० वा कसोटी सामना खेळत आहे. आजच त्याच्या नावाची प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये कारकीर्दीतील १३ वे शतक झळकावले.
गेल्या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर सूर गवसलेल्या रहाणेने नववे कसोटी शतक पूर्ण केले. पुनरागमन करणारा लोकेश राहुल (५७ धावा) आणि विराट कोहली (१३ धावा) उपाहारानंतर बाद झाल्यावर पुजारा व रहाणे यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी केली. शिखर धवन (३५) आज पहिल्याच सत्रात बाद झाला. राहुल फॉर्मात असल्याचे दिसत होते. त्याने पुजारासोबत ११२ चेंडूंमध्ये ५० धावांची भागीदारी केली. राहुल ३१ व्या षटकात धावबाद झाला. पुजाराने संयमी खेळी करताना २२५ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व १ षटकार लगावला. रहाणेने १६८ चेंडूंमध्ये १२ चौकार ठोकले.
मालिकेत सलग दुस-यांदा शतक झळकावणाºया पुजाराने चार हजार धावांचा पल्ला गाठला. यापूर्वीच्या कसोटी डावांमध्ये त्याने १७, ९२, २०२, ५७ व १५३ धावांच्या खेळी केल्या आहेत. पुजारा सचिननंतर श्रीलंकेविरुद्ध सलग तीन शतके ठोकणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला. अखेरच्या सत्रात पुजारा-रहाणे जोडीने भारताला सहज अडीचशेचा पल्ला ओलांडून दिला. भारताने ७७ व्या षटकात तीनशे धावांचा पल्ला गाठला. रहाणेने जवळजवळ १० महिन्यांच्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली. गेल्या वर्षी इंदूरमध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध १८८ धावांची खेळी केली होती. रहाणेला त्यापूर्वी रंगना हेराथच्या गोलंदाजीवर डीआरएसचा लाभ मिळाला. त्यावेळी चेंडू त्याच्या बॅटला लागल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पंच ब्रूस आॅक्सेनफोर्ड यांना निर्णय बदलावा लागला.
त्याआधी, राहुल व पुजारा यांनी दुसºया विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. कोहलीने पुजाराच्या साथीने तिसºया विकेटसाठी २४ धावा जोडल्या. कोहली ३९ व्या षटकात रंगना हेराथच्या बाहेर जाणाºया चेंडूवर स्लिपमध्ये तैनात अँजेलो मॅथ्यूजकडे झेल देत माघारी परतला. (वृत्तसंस्था)
पुजाराच्या चार हजार धावा
चेतेश्वर पुजाराने ५० व्या कसोटीत १३ व्या शतकांसह चार हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो १५ वा भारतीय फलंदाज ठरला. गालेतील पहिल्या कसोटीत १५३ धावा ठोकणाºया पुजाराने आज ८४ व्या डावात ३४ वी धाव घेताच चार हजार धावा पूर्ण केल्या.
५० व त्यापेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा पुजारा ६१ वा भारतीय खेळाडू असून, सुवर्ण महोत्सवी कसोटीत शतक नोंदविणारा तो सातवा फलंदाज आहे. भारताकडून सुवर्ण महोत्सवी कसोटीत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावे आहे. त्यांनी १९७९ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर दुसºया डावात २२१ धावा ठोकल्या होत्या.
५० व्या कसोटीत शतक ठोकण्याचा मान सर्वप्रथम पॉली उम्रीगर यांनी पटकविला. पाकविरुद्ध १९६१ मध्ये नवी दिल्लीत त्यांनी ११२ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, कपिल देव, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली आणि आता पुजारा यांनी या यादीत स्थान मिळविले.
धावफलक
भारत पहिला डाव : शिखर धवन पायचित गो. दिलरुवान परेरा ३५, लोकेश राहुल धावबाद (चांदीमल/डिकवेला) ५७, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १२८, विराट कोहली झे. मॅथ्यूज गो. हेरथ १३, अजिंक्य रहाणे खेळत आहे १०३, अवांतर ००, एकूण : ९० षटकांत ३ बाद २४४ धावा. गोलंदाजी : नुवान प्रदीप १७.४-२-६३-०, रंगना हेरथ २४-३-८३-१, दिमुथ करुणारत्ने ३-०-१०-०, दिलरुवान परेरा १८-२-६८-१, मलिंडा पुष्मकुमारा १९.२-०-८२-०, धनंजय डिसिल्व्हा ८-०-३१-०.