अॅडलेड : कर्णधार जो रुटने झळकावलेल्या दमदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने अॅशेस मालिकेतील दुस-या कसोटी सामन्यात आॅस्टेÑलियाविरुद्ध विजयाच्या आशा कायम राखल्या आहेत. यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्याची संधी इंग्लंडसाठी निर्माण झाली आहे.
३५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ४ बाद १६७ धावांची मजल मारली. अजूनही इंग्लंडला १७८ धावांची आवश्यकता असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक आहेत. त्यांची सर्व मदार कर्णधार रुटवर असून त्याला इतरांकडून साथ मिळणे आवश्यक आहे. याआधी जेम्स अँडरसनच्या भेदक माºयाच्या जोरावर इंग्लंडने कांगारुंचा दुसरा डाव केवळ १३८ धावांवर संपुष्टात आणला.
६७ धावांवर खेळत असलेल्या रुटने आतापर्यंत ११४ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार मारले. रुटला साथ देणारा ख्रिस वोक्स नाबाद ५ धावांवर खेळत आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची आघाडीची फळी कोसळली. अॅलिस्टर कूक (१६), मार्क स्टोनमैन (३६) यांनी ५३ धावांची सलामी दिली, परंतु दोघेही एका धावेच्या अंतराने परतल्याने इंग्लंड अडचणीत आले.
नॅथन लिओनने कूकला पायचीत करत कांगारुंना पहिले यश मिळवून दिले. यानंतर मिशेल स्टार्कने स्टोनमैनला बाद करुन यंदाच्या वर्षातील ५६वा बळी घेतला. यासह २०१७ साली सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून स्टार्कने मान मिळवला. यानंतर आलेल्या जेम्स विन्सस (१५) याने चांगली सुरुवात केली, परंतु मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. रुट आणि डेव्हिड मलान (२९) यांनी चौथ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सावरले. मात्र, पॅट कमिन्सने दिवस संपायच्या अखेरीस मलानला त्रिफळाचीत केले.
तत्पूर्वी, जेम्स अँडरसनने ४३ धावांत ५ बळी घेत आॅस्टेÑलियाचे कंबरडे मोडले. ख्रिस वोक्सनेही ३६ धावांत ४ बळी घेत कांगारुंना बॅकफूटवर ठेवले. अँडरसनने कारकिर्दीत पहिल्यांदाच आॅस्टेÑलियामध्ये ५ बळी घेण्याची कामगिरी केली. (वृत्तसंस्था)