Join us  

सनथ जयसूर्याचा विक्रम अखेर परेराने काढला मोडीत

क्रिकेट विश्वात सर्वाधिक 11 षटकारांचा विक्रम जयसूर्याच्या नावावर होता. पण आता हा विक्रम श्रीलंकेच्या थिसारा परेराने मोडीत काढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 3:15 PM

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेट विश्व अजूनही श्रीलंकेचा माजी तडफदार सलामीवीर सनथ जयसूर्याला विसरलेले नाही. कारण आपल्या तडाखेबंद फलंदाजीने त्याने कोट्यावधी चाहत्यांची मने जिंकून घेतली होती. क्रिकेट विश्वात सर्वाधिक 11 षटकारांचा विक्रम जयसूर्याच्या नावावर होता. पण आता हा विक्रम श्रीलंकेच्या थिसारा परेराने मोडीत काढला आहे. श्रीलंकेकडून सर्वाधिक षटकारांचा विक्रम आता परेराच्या नावावर असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात परेराने चक्क 13 षटकार लगावले आणि जयसूर्याचा विक्रम मोडीत काढला.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेपुढे 320 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा अर्धा संघ फार कमी धावांमध्ये माघारी परतला होता. त्यानंतर परेराची ही झंझावाती खेळी पाहायला मिळाली. परेराने या खेळीमध्ये फक्त 74 चेंडूंमध्ये 13 षटकारांच्या मदतीने तब्बल 140 धावांची तुफानी खेळी साकारली. पण परेराच्या या खेळीनंतरही श्रीलंकेला हा सामना जिंकता आला नाही. श्रीलंकेचा डाव यावेळी 298 धावांमध्ये संपुष्टात आला. या विजयासह न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

टॅग्स :श्रीलंकान्यूझीलंड