Join us  

सॅम कुरेनने घेतली कठोर परीक्षा- रवी शास्त्री

आमच्या संघाने किती झुंजारवृत्ती दाखविली हे तुम्ही धावसंख्येवरून ठरवू शकणार नाही, असे शास्त्री म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 4:32 AM

Open in App

नवी दिल्ली : इंग्लंडच्या सांघिक प्रयत्नांमुळे आम्ही त्यांना कसोटी मालिका गमविलेली नाही. उलट अष्टपैलू सॅम कुरेनच्या शानदार खेळामुळे आम्ही संकटात सापडलो होतो. वेळोवेळी त्याने भारतीय संघाची कठोर परीक्षा घेतली, असे मत भारतीय कोच रवी शास्त्री यांनी ४-१ ने झालेल्या मालिका पराभवावर व्यक्त केले आहे.आमच्या संघाने किती झुंजारवृत्ती दाखविली हे तुम्ही धावसंख्येवरून ठरवू शकणार नाही, असेही शास्त्री म्हणाले. ईएसपीएन- क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत ते पुढे म्हणाले, ‘आम्ही पूर्णपणे अपयशी ठरलो असे मी मानणार नाही. आम्ही पाच सामन्यांची मालिका जिंकण्याचे प्रयत्न नक्कीच केले. पण जेथे आवश्यक असेल तेथे श्रेय द्यायलाच हवे. विराट आणि मला मालिकावीराची निवड करण्यास सांगण्यात आले. आम्ही दोघांनी सॅम कुरेनची एकमुखी निवड केली. सॅमने भारताला फार त्रास दिला. त्याच्या खेळीमुळे अनेकदा विजयाचा घास हिरावून नेला. इंग्लंडपेक्षा कैकपटींनी कुरेनकडून संघाला फटका बसला.’पहिल्या कसोटीत इंग्लंडची ७ बाद ८७ अशी अवस्था झाली असताना कुरेनने धावा काढल्या. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात यजमानांनी ८६ धावांत सहा गडी गमावले होते. त्याचवेळी कुरेनने धावा काढल्या. एजबस्टन कसोटीच्या पहिल्या डावात आम्ही बिनबाद ५० अशी चांगली सुरुवात केल्यानंतर त्याने बळी घेतले. मालिकेत मोक्याच्या क्षणी कुरेनने धावा काढल्या, शिवाय बळीदेखील घेतले.भारतीय संघाने झुंजारवृत्ती दाखविल्याचे समर्थन करीत शास्त्री म्हणाले, ‘आम्ही अद्याप जगात नंबर वन आहोत. आम्ही किती संघर्ष केला हे इंग्लंडला माहिती आहे. आम्ही सपशेल नांगी टाकलेली नाही, ही गोष्ट मीडिया, चाहते आणि आमच्या आत्म्याला देखील माहिती आहे.’आमच्या संघाने किती झुंजारवृत्ती दाखविली हे तुम्ही धावसंख्येवरून ठरवू शकणार नाही. आम्ही अद्याप जगात नंबर वन आहोत. आम्ही किती संघर्ष केला हे इंग्लंडला माहिती आहे. आम्ही सपशेल नांगी टाकलेली नाही-रवी शास्त्री

टॅग्स :सॅम कुरेनरवी शास्त्रीभारत विरुद्ध इंग्लंड