Join us  

India vs England 4th Test: अवघ्या 20 वर्षांचा 'हा' खेळाडू ठरला इंग्लंडसाठी बाजीगर

India vs England 4th Test Series: अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 12:37 PM

Open in App

साऊथम्प्टन: भारताला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. यामुळे भारतानं सामन्यासह मालिकादेखील गमावली. फलंदाजांनी कच खाल्ल्यानं भारतीय संघावर इंग्लंडमध्ये सलग तिसरी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवली. इंग्लंडनं दिलेल्या 245 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 175 धावांमध्ये आटोपला. मोईन अलीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडनं भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. मोईन अलीनं दोन्ही डावांमध्ये मिळून 9 फलंदाजांना तंबूची वाट दाखवली. मात्र या सामन्याच्या पहिल्याच दिवशी अवघा 20 वर्षांचा सॅम कुरेन इंग्लंडच्या मदतीसाठी धावून आला. बर्मिंगहॅम कसोटीत भारताला सतावणाऱ्या कुरेननं साऊथम्प्टन कसोटीतही भारतीय गोलंदाजांची कसोटी पाहिली. चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा संघ 6 बाद 86 असा संकटात सापडला होता. त्यावेळी इंग्लंडला 150 धावांच्या आत गुंडाळण्याची संधी भारताकडे होती. मात्र कुरेननं मोईन अलीच्या साथीनं किल्ला लढवला. या दोघांनी 81 धावांची भागिदारी करत संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडला. अली 40 धावा काढून बाद झाल्यानंतर कुरेननं शेपटाच्या मदतीनं भारताला तडाखा दिला. कुरेनच्या 78 धावांच्या खेळीमुळे इंग्लडनं 246 धावा उभारल्या. पहिल्या डावात इंग्लंड 6 बाद 86 अशा अडचणीत सापडला असताना, कुरेननं 78 धावांची बहुमूल्य खेळी केली. भारताला या सामन्यात 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. हे लक्षात घेतल्यास कुरेनच्या खेळीचं महत्त्व समजून येईल. संघाला फलंदाजीत तारल्यावर कुरेननं भारताच्या पहिल्या डाव्यात कर्णधार विराट कोहलीला माघारी धाडलं. यानंतर दुसऱ्या डावात 46 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. संघाला गरज असताना कुरेननं अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अवघ्या 20 वर्षांचा हा खेळाडू या मालिकेत भारतासाठी सातत्यानं डोकेदुखी ठरतो आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडसॅम कुरेन