Join us  

ICC World Cup 2019 : सर्वाधिक चौकारांच्या जोरावर ‘साहेब’ बनले विश्वविजेते

नशिबाची साथ असेल, तर गमावलेला सामनाही जिंकू शकतो... हे पाहता आले ते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 6:46 AM

Open in App

लंडन : नशिबाची साथ असेल, तर गमावलेला सामनाही जिंकू शकतो... हे पाहता आले ते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात. अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडशी बरोबरी साधली. यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडनेही बरोबरी साधली, मात्र सामन्यात सर्वाधिक चौकार मारलेले असल्यामुळे यजमान इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरले. न्यूझीलंडने सामन्यात १४, तर इंग्लंडने २२ चौकार मारले. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा विश्वचषक यजमान देशाने पटकावला आहे.याआधी भारत (२०११) आणि आॅस्टेÑलिया (२०१५) यांनी यजमान म्हणून विश्वविजेतेपद जिंकले होते. ऐतिहासिक लॉडर््स मैदानावर झालेल्या या रोमांचक सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडने त्यांना ५० षटकांत ८ बाद २४१ धावांवर रोखले. यानंतर इंग्लंडलाही ५० षटकात २४१ धावांत गुंडाळून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. या वेळी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १५ धावा फटकावल्या. न्यूझीलंडकडून या लक्ष्याचा पाठलाग करताना जेम्स नीशामने जबरदस्त फटकेबाजी करीत एका षटकारासह १३ धावा केल्या. या वेळी पहिला चेंडू जोफ्रा आर्चरने वाइड टाकल्याने किवींनी ५ चेंडूत १४ धावा केल्या. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना मार्टिन गुप्टिल दुसरी धाव घेताना धावबाद झाला आणि पुन्हा एकदा बरोबरी झाली. मात्र सामन्यात इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारले असल्याने त्यांच्या पहिल्या विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले.

टॅग्स :इंग्लंडवर्ल्ड कप 2019