Join us  

साहाच्या खांद्यावर मॅँचेस्टरमध्ये शस्त्रक्रिया

रिद्धिमान साहाच्या खांद्यावर मॅँचेस्टरमध्ये जुलैच्या शेवटी किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात शस्त्रक्रिया होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 2:02 AM

Open in App

नवी दिल्ली : बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर टाइमलाईन पोस्ट करताना रिद्धिमान साहाच्या खाद्यावर मॅँचेस्टरमध्ये जुलैच्या शेवटी किंवा आॅगस्टच्या सुरुवातीला शस्त्रक्रिया होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या टाइमलाईनमुळे एनसीएने त्याच्या रिहॅबिलिटेशन कार्यक्रमात कथित गडबड केली असल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.बीसीसीआयने स्पष्ट केले की,‘रिद्धिमान साहाच्या खांद्यावर मॅँचेस्टरमध्ये जुलैच्या शेवटी किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात शस्त्रक्रिया होईल. मॅँचेस्टरमधील डॉ.लेनार्ड फंक ही शस्त्रक्रिया करतील. भारतीय संघव्यवस्थापन आणि परिचालन संचालकाच्या देखरेखीखाली एनसीएमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.’साहाची इंग्लंडविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी निवड झालेली नाही, पण बोर्डाने त्याच्या फिटनेसबाबत पूर्णपणे खुलासा केलेला नाही. बीसीसीआयने आपली बाजू सांभाळताना एनसीएमध्ये त्याचा पूर्ण उपचार भारतीय संघ व्यवस्थापन आणि परिचालन संचालकांच्या देखरेखीखाली करण्यात आल्याचे म्हटले आहे. बीसीसीआयच्या टाइमलाईनमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. सबा करीम (महाव्यवस्थापक) यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट परिचालनने हा मुद्दा कसा हाताळला, असा प्रश्न निर्माण झाला आहे.साहा वरच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखत असल्यामुळे २९ जानेवारी रोजी एनसीएमध्ये पोहोचला. त्याने त्याचसोबत खांद्याच्या दुखापतीबाबत सांगितले. फेब्रुवारीमध्ये त्याचा एमआरआय स्कॅन करण्यात आला. त्यात लॅबरला टीयरचा खुलासा झाला. याचा अर्थ त्याच्या खांद्याला दुखपात जानेवारीमध्ये झाली होती. त्याबाबत बीसीसीआयने अखेर जुलैमध्ये खुलासा केला. एनसीएचा कुठलाही अधिकारी याबाबत स्पष्टीकरण देत नाही.टाइमलाईननुसार इंजेक्शन घेतल्यानंतर किमान सहा महिन्यांच्या रिहॅबनंतर साहाला १९ मार्च रोजी आयपीएल सुरू होण्यास केवळ अडीच आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना फिट घोषित करण्यात आले.साहाला पुन्हा ७ मे रोजी खांद्याला दुखापत झाली. त्याला दिल्लीमध्ये अल्ट्रासाऊंड इंजेक्शन देण्यात आले. त्याला आयपीएलच्या पाच लढतींमध्ये विश्रांती देण्यात आली.दरम्यान, १५ मे रोजी साहाने एनसीएचे मुख्य फिजिओ आशिष कौशल यांना दाखविण्याची विनंती केली. त्यामुळे खांद्याच्या दुखापतीबाबत माहिती घेता येईल, असे साहाला वाटले. कौशल यांनी साहाच्या खांद्याची तपासणी केल्यानंतर सारखीच स्थिती कायम असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)कौशल यांनी सनरायझर्सच्या फिजिओला याबाबत माहिती दिली आणि त्याचा रिहॅब कार्यक्रम कायम ठेवला. टीम इंडियाच्या फिजिओला याबाबत माहिती देण्यात आली.त्यामुळेसाहाला आयपीएल खेळण्याची परवानगी कशी ?पुढील प्रश्न असा उपस्थित होतो की, कौशिक यांनी साहाची तपासणी करण्यात आल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीतील स्थिती कायम असल्याचे सांगितले असताना सनरायझर्स हैदराबाद किंवा बीसीसीआयने त्याला २५ मे रोजी आयपीएल सामना खेळण्याची परवानगी कशी दिली. जर स्थिती तशीच होती तर तो त्यातून १० दिवसांमध्ये कसा सावरू शकतो ? बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता तो म्हणाला,‘माझे मतही तुमच्याप्रमाणेच आहे.’ ३ ते १३ जुलै या कालावधीत साहाच्या खांद्याची दुखापत चिघळली आणि स्टेराईड इंजेक्शनचाही त्यावर काहीच प्रभाव झाला नाही.

टॅग्स :वृद्धिमान साहाभारतक्रिकेट