Join us  

Sachin Tendulkar Last Message to Shane Warne: सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नला मृत्यूआधी शेवटचा मेसेज काय केला होता माहित्येय का? मास्टरब्लास्टरने स्वत:च दिली माहिती

सचिन आणि शेन वॉर्न यांच्यात खूप चांगली मैत्री होती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 4:18 PM

Open in App

Sachin Tendulkar last message to Shane Warne: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं ४ मार्चला वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. तो थायलंडमध्ये असताना त्या झटका आला. त्या वाचवण्यासाठी वैद्यकीय पातळीवर शर्थीचे प्रयत्न करण्यात आले पण त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. शेन वॉर्नच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर हे दोघे मैदानात जितके एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते, तितकेच मैदानाबाहेर ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते.  शेन वॉर्नला आज अंतिम निरोप देण्यात येणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत वॉर्नचा श्रद्धांजली सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचदरम्यान सचिन तेंडुलकरने एक महत्त्वाची माहिती दिली.

सचिन तेंडुलकरने महान फलंदाज ब्रायन लाराशी मुलाखतीत चर्चा करताना काही गोष्टी सांगितल्या. सचिन म्हणाला, "गेल्या वर्षीचं IPL संपल्यानंतर मी लंडनला सुटीसाठी गेलो होतो. त्यावेळी वॉर्न मला भेटला. आम्ही बराच वेळ एकत्र घालवला. आम्ही गोल्फ खेळलो आणि खूप धमाल केली. तो गोल्फचा चेंडूही तितकाच चांगल्या पद्धतीने स्पिन करत होता हे मी त्यावेळी पाहिलं. त्यानंतरही मी भारतात परतलो, पण आम्ही कधीतरी एकमेकांना मेसेज करायचो."

"मी लंडनमध्ये त्याला भेटलो तेव्हा तो एकदम फिट होता. पण मी त्याला त्याच्या मृत्यूच्या आधी शेवटचा मेसेज कधी आणि काय केला होता हे मला नीट आठवतंय. त्याच्या बाईकचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी मी त्याला मेसेज केला होता की, 'सारं काही ठीक आहे ना? मला आशा आहे की तुला फारसं लागलं नसेल.' त्यावर शेन वॉर्नचा रिप्लाय आला होता की, मी बाईक फिरवायला निघालो आणि अपघात झाला पण फार काही सिरीयस नाही. त्यावर मी त्याला शेवटचा मेसेज केला होता की, चेंडू हाताने फिरवणं ही गोष्ट चांगली होती, पण बाईक फिरवायला निघताना अपघात होणं योग्य नाही. काळजी घे. त्यावर वॉर्नचा पुन्हा मेसेज आला की मी औषधं घेतली आहेत आणि ४-५ दिवसात मी ठणठणीत होईन", असा शेवटचा संवाद सचिनने सांगितला.

टॅग्स :शेन वॉर्नसचिन तेंडुलकर
Open in App