Join us  

...अन् कारमधला तो 'छोटा फलंदाज' निघाला 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर!

सचिनच्या 'त्या' बॅटिंगआधी काय घडलं माहितीय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 12:39 PM

Open in App

मुंबईः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रस्त्यावर बॅटिंग केल्याचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला आहेच. 'क्रिकेटच्या देवा'सोबत खेळण्याची अविस्मरणीय संधी ज्या तरुणांना मिळाली, त्यांचा सगळ्यांनाच हेवा वाटतोय. पण, या अद्भुत दृश्याआधी जो संवाद झाला, तोही तितकाच भारी होता. सचिन आणि त्याच्या मित्रांची कार रस्त्याच्या कडेला थांबली... त्यातून अतुल रानडे खाली उतरला... रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना म्हणाला, 'भाऊ, आमच्याकडे एक छोटा फलंदाज आहे, त्याला जरा बॅटिंग करायचीय'... तरुणांनी होकार दिला... कारचं दार उघडलं आणि त्यातून साक्षात सचिन तेंडुलकर बाहेर आल्याचं पाहून तरुणांना अक्षरशः 'याड' लागलं... हा किस्सा स्वतः अतुल रानडेनं 'मुंबई मिरर'ला सांगितला. त्यातून, लहानपणी साहित्य सहवासमध्ये कल्ला करणारी 'सचिन गँग' आजही तितकीच खोडकर असल्याचा प्रत्यय येतो.

बालपण आठवलं अन् सचिन कारमधून उतरला!अचानक असं काय झालं की सचिनला एकदम रस्त्यावर बॅटिंग करायची हुक्की आली, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्याबद्दल अतुल रानडेनं माहिती दिली. सचिन, मी आणि आमचा जिगरी दोस्त डॉ. संजय डिनरसाठी जात होतं. आमची कार वांद्र्याजवळून जात असताना, काही मुलं क्रिकेट खेळत असल्याचं दिसलं. संजय जुन्या काळात हरवला. बालपणीचे दिवस पुन्हा जगता आले तर, अशी इच्छा त्याने सचिनकडे व्यक्त केली आणि पुढे काय घडलं हे सगळ्यांनीच पाहिलं, असं अतुलनं सांगितलं. सचिन बॅटिंग करायला लागल्यावर अतुलने रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यामुळे आजूबाजूने जाणाऱ्या गाड्याही थांबल्या. विक्रमादित्य सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत असल्याचं पाहून सगळ्यांचेच डोळे चमकले आणि 'सचिन-सचिन' हा अजरामर नारा घुमला.  

   

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेट