Join us  

Virat Kohli : मला जो विक्रम नाही जमला तो तू कर...! सचिन तेंडुलकरनं दिलं 'विराट' लक्ष्य

ICC ODI World Cup 2023 : आज विराट कोहलीने शतक झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 7:13 PM

Open in App

भारताचा आघाडीचा फलंदाज आणि आजचा बर्थ डे बॉय विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कठीण खेळपट्टीवर शतक झळकावून इतिहास रचला. खरं तर पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक झळकावणारा कोहली जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय वन डेमध्ये सर्वाधिक ४९ शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी साधली. दिग्गज, किंग कोहली, शतकांचा सम्राट, रनमशीन अशा विविध नावांनी जगभर ओळख असलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा क्रिकेटचा बादशाह असल्याचे दाखवून दिले. किंग कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी करत वन डे मध्ये ४९ शतके झळकावण्याचा भीमपराक्रम केला. विराटने सावध खेळी करत शतकाला गवसणी घातली. त्याने १० चौकारांच्या मदतीने १२० चेंडूत शतक ठोकून तमाम भारतीयांना वाढदिवशी भेट दिली.

किंह कोहलीच्या शतकी खेळीनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच सचिन तेंडुलकरने देखील भारतीय खेळाडूचे तोंडभरून कौतुक केले. तसेच जे मी करू शकलो नाही ते तू कर अशा शुभेच्छा देखील तेंडुलकरने कोहलीला दिल्या. सोशल मीडियावर एक पोस्ट करत सचिनने म्हटले, "विराटने अप्रतिम खेळी केली... मला आशा आहे की, तू ४९ वरून ५० वर जाशील आणि येत्या काही दिवसांत माझा विक्रम मोडशील."

सेहवागकडून किंग कोहलीच्या खेळीला दाद

भारताची 'विराट' धावसंख्या भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३२७ धावांची आवश्यकता आहे. विराटने नाबाद १०१ धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेसमोर मोठे लक्ष्य उभारले. कर्णधार रोहित शर्मा (४०) आणि शुबमन गिल (२३) यांनी चांगली सुरूवात केली पण भारतीय कर्णधार बाद होताच भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. सावध खेळी करत असलेल्या गिलला केशव महाराजने आपल्या जाळ्यात फसवले. मग किंग कोहलीने मोर्चा सांभाळला अन् श्रेयस अय्यरसोबत डाव पुढे नेला. अय्यरने ८७ चेंडूत ७७ धावांची अप्रतिम खेळी करून भारताची धावसंख्या ३०० पार पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण लुंगी एनगिडीने त्याला बाद केले अन् भारताला तिसरा झटका बसला. त्यानंतर लोकेश राहुल (८) आणि सूर्यकुमार यादव (२२) यांनी विराटला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. अखेरच्या काही षटकांत रवींद्र जडेजाने १५ चेंडूत २९ धावांची चांगली खेळी करून शतकवीर कोहलीला साथ दिली. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपसचिन तेंडुलकरविराट कोहलीविरेंद्र सेहवाग