Join us  

'क्रिकेटचा देव' झाला 45 वर्षांचा, आज सचिनचा तेंडुलकरचा वाढदिवस

कलियुगात देव जन्माला येत नाही, असे म्हटले जाते. पण 24 एप्रिल 1973 ला देव जन्माला आला तो भारताच्या क्रिकेट पंढरीतच.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 12:00 AM

Open in App

मुंबई : आपल्या खेळीने स्वर्गीय आनंद देणारा... ज्याचे शतक राष्ट्रीय सणासारखे साजरे व्हायचे... ज्याने मॅचफिक्सिंगनंतर लोकांना क्रिकेटकडे वळवलं... ज्याने क्रिकेट चाहत्यांच्या पिढ्या घडवल्या... ज्याला भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात देवत्व बहाल करण्यात आलं, तो सर्वांचा लाडका मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे.

कलियुगात देव जन्माला येत नाही, असे म्हटले जाते. पण 24 एप्रिल 1973 ला देव जन्माला आला तो भारताच्या क्रिकेट पंढरीतच. आपल्या अंगावर अनेक दुखापती झेलत तो चाहत्यांना अवीट आनंद देण्यासाठी खेळत राहीला. सचिन हा माणूस म्हणून सामान्य वाटत असला तरी खेळाडू म्हणून कुठल्यातरी परग्रहावरचा वाटायचा. कारण त्याची गुणवत्ता ही सूर्यासारखी अद्वितीय अशीच होती. त्याच्या बॅटमधून निघणारे फटके नजरेचे पारणे फेडणारे होते.

क्रिकेट बरेच जण खेळतात. बरेच फलंदाजही होऊन गेले आणि यापुढेही होतील, पण या सम हाच, असे सचिनचा खेळ पाहून आपसूच साऱ्यांच्या ओठांवर यायचे. सचिनने बरेच विश्वविक्रमही केले. ते मोडलेही जातील. पण क्रिकेट विश्वाला विश्वविक्रमांची सवय लावली ती सचिननेच.

काही दिवसांपूर्वीच सचिन एका रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसला. असाच एके दिवशी तो मैदानातही खेळेल आणि पुन्हा त्याच्या अविस्मरणीय फटक्यांची माळ पाहायला मिळेल, अशी आशा त्याचे चाहते नक्कीच बाळगत असतील. कारण सचिन निवृत्त झाला असला तरी त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात त्याचे स्थान कधीही खालसा होणार नाही. त्यामुळे चाळीशीतला सचिन कायमच चिरतरूण राहील.

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेटक्रीडा