नवी दिल्ली : भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक आणि निवडकर्ते साबा करीम यांची बीसीसीआयने महाव्यवस्थापकपदी (क्रिकेट परिचालन) नियुक्ती केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून करीम यांचे नाव या पदासाठी पुढे येत होते. माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाददेखील शर्यतीत होते. करीम १ जानेवारी रोजी पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ते सीईओ राहुल जोहरी यांना रिपोर्ट करतील. बोर्डाच्या बैठकीत ते जोहरी यांचे सहायक असतील, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. सप्टेंबरमध्ये ‘दुटप्पी भूमिके’च्या मुद्यावरून एम. व्ही. श्रीधर यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त होते. श्रीधर यांचे ३० आॅक्टोबरला निधन झाले.
करीम यांना स्थानिक क्रिकेट आणि त्यातील गुंतागुंत आदींची इत्थंभूत माहिती आहे. एक कसोटी आणि ३४ वन-डेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १८ वर्षांच्या करिअरमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज या नात्याने १२० प्रथमश्रेणी, १२४ लिस्ट ए सामने खेळले आहेत. बांगलादेशात झालेल्या आशिया चषकादरम्यान त्यांच्या उजव्या डोळ्याला इजा झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. २०१२ मध्ये ते पूर्व विभागातून राष्टÑीय निवडकर्ते बनले. टिस्कोत काही काळ ते कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स महाव्यवस्थापक होते.