Join us  

एस. श्रीसंतचा निर्धार; विराट कोहलीबद्दल केलं मोठं विधान, म्हणाला...

आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे गोलंदाज एस श्रीसंतवर घातलेली आजीवन बंदी मागे घेण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 9:15 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांमुळे गोलंदाज एस श्रीसंतवर घातलेली आजीवन बंदी मागे घेण्यात आली असून त्याच्या बंदीचा काळ केवळ सात वर्षांचा करण्याचा निर्णय बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी मंगळवारी सुनावला. श्रीसंतला 2013 मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंगच्या आरोपवरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर बीसीसीआयने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि 10 लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता त्याला दिलासा मिळाला असून 2020ला त्याच्या बंदीचा काळ संपुष्टात येणार आहे. सप्टेंबर 2013पासून बंदीचा काळ मोजण्यात येणार आहे आणि त्यानुसार त्याने शिक्षेतील सहा वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे श्रीसंतला पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे वेध लागले आहेत. IANSशी बोलताना तो म्हणाला,''ही बातमी ऐकून मला प्रचंड आनंद झाला आहे. माझ्या हितासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाचे आभार आणि त्यांच्या प्रार्थनांना आज यश मिळाले. मी आता 36 वर्षांचा आहे आणि पुढील वर्षी 37 वर्षांचा होईन. कसोटी क्रिकेटमध्ये माझ्यानावावर 87 विकेट्स आहेत आणि मला विकेट्सचे शतक साजरे करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची आहे. भारतीय कसोटी संघात मी कमबॅक करेन, असा मला विश्वास आहे. मला विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची नेहमीच इच्छा होती.'' 

श्रीसंतने 27 कसोटी आणि 53 वन डे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीत 87 विकेट्स घेतल्या आहेत, तर वन डेत त्याच्या नावावर 75 विकेट्स आहेत. 2011च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता. इंडियन प्रीमिअर लीगच्या पाच मोसमात त्यानं 44 सामन्यांत 40 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीसंतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मुंबईत अटक केली होती. याप्रकरणी 36 जणांना अटक केली होती. पण या 36 पैकी एकाही व्यक्तीवर आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. श्रीसंतने 2005 साली श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथील एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :श्रीसंतविराट कोहलीबीसीसीआयआयपीएल