Join us  

एस.श्रीसंतने दुस-या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे दिले संकेत, बंदी आयसीसीने घातलेली नाही

बीसीसीआयने आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्यामुळे चिडलेल्या एस.श्रीसंतने भविष्यात दुस-या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 4:49 PM

Open in App
ठळक मुद्देकोर्टाच्या एक सदस्यीय न्यायाधीशाने 18 सप्टेंबरला बीसीसीआयला श्रीसंतवरील बंदी उठवण्याचे आदेश दिले. त्याने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचे उदहारण दिले.

कोची - बीसीसीआयने आजीवन क्रिकेट खेळण्यावर बंदी घातल्यामुळे चिडलेल्या एस.श्रीसंतने भविष्यात दुस-या देशाकडून क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले आहेत.  केरळ उच्च न्यायालयाने श्रीशांतच्या  क्रिकेट खेळण्यावरील आजीवन बंदीचा निर्णय कायम ठेवला. 2013 सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतचे नाव आल्यानंतर  बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई केली.  

कोर्टाच्या एक सदस्यीय न्यायाधीशाने 18 सप्टेंबरला बीसीसीआयला श्रीसंतवरील बंदी उठवण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात बीसीसीआयने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने एक सदस्यीय खंडपीठाचा निर्णय रद्द करत आजीवन बंदी कायम ठेवली. श्रीसंतने एशियानेट न्यूजला दिलेल्या मुलाखतीत दुस-या देशाकडून क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्यावर आयसीसीने नाही, बीसीसीआयने बंदी घातली आहे. भारतासाठी नसेल पण मी दुस-या देशासाठी खेळू शकतो. मी आता 34 वर्षांचा असून मी आणखी जास्तीत जास्त सहावर्ष क्रिकेट खेळू शकतो. आपण भारतीय संघ म्हणतो असलो तरी, बीसीसीआय खासगी संस्था आहे. त्यामुळे मी दुस-या देशाकडून खेळू शकतो. मला केरळसाठी रणजी, इराणी ट्रॉफी जिंकायची इच्छा होती पण तो निर्णय सर्वस्वी बीसीसीआयच्या हातात होता असे श्रीसंत मुलाखतीत म्हणाला. 

त्याने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांचे उदहारण दिले. या दोन्ही संघांचे मालक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्या संघांवर दोनवर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या पुढच्या मोसमात हे दोन्ही संघ दिसणार आहेत. 

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चौकशी करणा-या लोढा समितीने बंद पाकिटातून सर्वोच्च न्यायालयाला 13 नावे दिली पण मलाच एकटयाला का टार्गेट केलं जातंय? मी याबद्दल प्रश्चन विचारतच राहणार असे श्रीसंत म्हणाला. 

काही दिवसांपूर्वी श्रीसंतनं खेळावरील घातलेली बंदी उठवण्यासंदर्भातील केलेलं अपील बीसीसीआयनं फेटाळून लावलं होतं. बीसीसीआय कोणताही भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असं पत्र लिहून श्रीसंतला कळवलं होतं. श्रीसंतनं 2013च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात लावलेले प्रतिबंध हटवण्यासाठी प्रशासक समिती(सीओए)कडेही अपील केलं होतं. त्यानंतर बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी श्रीसंतला पत्र लिहून बंदी हटवणार नसल्याचं सांगितलं होतं.

ते म्हणाले होते, बीसीसीआयनं सूचित केल्याप्रमाणे श्रीसंतवर आजीवन बंदी कायम राहील आणि त्याला प्रतिस्पर्धी संघात खेळण्यासाठी स्वीकृती नसेल. त्यानं केरळच्या स्थानिक न्यायालयातही बंदी हटवण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती, त्यालाही आमच्या वकिलांनी उत्तर दिलंय. 

बीसीसीआयनं भ्रष्टाचारविरोधात शून्य सहिष्णुतेची नीती वापरली आहे. कोणत्याही न्यायालयानं श्रीसंतला स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून मुक्त केलेलं नाही. त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कनिष्ठ न्यायालयानं फेटाळून लावला होता. ब्रिटनच्या क्लब क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी श्रीसंत प्रयत्नशील असून, त्यासाठी बंदी उठवण्याची मागणी केली होती. मात्र बीसीसआयनं त्याच्यावरील बंदी उठवण्यास नकार दिला होता.

टॅग्स :एस श्रीसंतक्रिकेट