Join us  

सापत्न वागणुकीमुळे कुलदीपची कारकीर्द धोक्यात

चेपॉकवर शेवटच्या दोन दिवसांत फिरकीला साथ लाभते. या पार्श्वभूमीवर अश्विन आणि कुलदीपचे स्थान निश्चित मानले जात होते. कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला हेच सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 5:40 AM

Open in App

चेपॉकवर अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि ‘चायनामॅन’ कुलदीप यादव हे दोघे पहिल्या पसंतीचे फिरकी गोलंदाज असतील, असे वाटले होते. पण ऐनवेळी माशी कुठे शिंकली, कोण जाणे, कुलदीपला बाहेर ठेवण्यात आले. अक्षर पटेल ऐनवेळी अनफिट असल्याचे कळताच कर्णधार विराट कोहलीने शाहबाज नदीम याला संधी दिली. यामुळे दोन वर्षांनंतर कसोटी खेळण्याचे कुलदीपचे स्वप्न पुन्हा हवेत विरले.मायदेशातील कसोटी मालिकेतील आव्हाने पाहता फिरकी गोलंदाजीचा पारंपरिक मार्ग पत्करणे अपेक्षित होते. चेपॉकवर शेवटच्या दोन दिवसांत फिरकीला साथ लाभते. या पार्श्वभूमीवर अश्विन आणि कुलदीपचे स्थान निश्चित मानले जात होते. कोहलीने सामन्याच्या पूर्वसंध्येला हेच सांगितले. तो म्हणाला,‘याआधी जानेवारी २०१९ला कसोटी खेळलेल्या कुलदीपला स्थानिक मैदानावर खेळविण्याची इच्छा आहे. तो आमच्या योजनांचा भाग असेल. खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी त्यांना लक्ष्य ठरवून देण्याची गरज आहे.’सामन्याच्या सकाळी मात्र चित्र वेगळे होते. अश्विनच्या सोबतीला वाॅशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांना संधी मिळाली. शाहबाजने पहिल्या डावात दोन गडी बाद केले, हा भाग वेगळा. मात्र डावखुरा कुलदीपचे पुनरागमन का हुकले, हे कोडे आहे. अक्षर पटेलच्या गुडघ्याला दुखणे उमळल्यानंतर नदीम ऐनवेळी आठवला. पण दोन वर्षांआधी सिडनीतील अखेरच्या कसोटीत पाच गडी बाद करणारा कुलदीप मात्र नजरेआड झाला.आम्हाला फलंदाजीसाठी उपयुक्त ठरेल, असा गोलंदाज खेळविण्याचा विचार असल्याचे विराटचे मत होते. मग कुलदीप प्रथमश्रेणीत शतकीवीरदेखील आहे, हे विराटला आठवले नाही काय? वॉशिंग्टनने ऑस्ट्रेलियात धावा काढल्या हे विराटच्या स्मरणात राहिले असावे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि भारताचा माजी फिरकी गोलंदाज व्यंकटीपथी राजू यांनी कुलदीपला वगळल्याबद्दल विराटला चांगलेच धारेवर धरले. कुलदीपला वगळण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याचे वॉन म्हणाला, तर ‘मी कर्णधार असतो तर अश्विनच्या दिमतीला कुलदीप आणि वॉशिंग्टन यांना संधी दिली असती,’ असे राजूने सांगितले. कुलदीप मॅचविनर असल्याचे राजूचे मत होते. गेल्या दोन वर्षांत तिन्ही प्रकारात त्याला सलग संधी नाकारण्यात आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केवळ बाकावर बसावे लागले, अश्विन जखमी झाल्यास किमान संधी मिळेल, या आशेपोटी मैदानात पाणी घेऊन जायचा, पण ती संधीदेखील मिळाली नाही. भारतीय संघात त्याला स्थान मिळत नसेल तर संघ व्यवस्थापनाने किमान त्याला स्थानिक क्रिकेटसाठी मोकळे करायला हवे. स्थानिक क्रिकेट खेळून तरी तो फॉर्ममध्ये येऊ शकेल. कुलदीपच्या पतनासाठी चाहत्यांचा कोहलीवर सर्वाधिक रोष आहे. कोहली त्याला सापत्न वागणूक देतो, असे अनेकांना वाटते. यामागील कारण कळायलाच हवे, असे अनेकांचे मत आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडकुलदीप यादवविराट कोहलीआर अश्विनवॉशिंग्टन सुंदर