Join us  

पराभवानंतर RCBला मोठा धक्का; कर्णधाराला भरावी लागणार मोठी रक्कम, आवेशलाही पडलं महागात

Faf du Plessis Fined Rs 12 Lakh for Slow Over Rate : लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एक धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 12:36 PM

Open in App

avesh khan throw helmet । बंगळुरू : लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या (LSG) पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) आणखी एक धक्का बसला आहे. वेळेत षटके न टाकल्यामुळे आरसीबीच्या संघाला दंड आकारला गेला आहे. त्यामुळे कर्णधार फाफ डू प्लेसिसला नियमानुसार १२ लाख रूपये भरावे लागणार आहेत. कर्णधार डू प्लेसिस सामन्यादरम्यान धिम्या गतीने षटके टाकल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. याशिवाय लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खानला देखील फटका बसला आहे.

लखनौच्या संघाने अखेरच्या चेंडूवर १ गडी राखून विजय मिळवला. अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आवेश खानने विजयाचा आनंद साजरा करताना उत्साहाच्या भरात हॅल्मेट फेकून दिले. याप्रकरणी मॅच रेफरीने त्याला फटकारले आहे. डू प्सेसिसबद्दल भाष्य करायचे झाले तर, आयपीएलच्या आचार संहितेनुसार त्याची या हंगामातील ही पहिलीच चूक आहे. त्यामुळे त्याला १२ लाख रूपये मोजावे लागणार आहेत. खरं तर आवेश खानला कोणताही आर्थिक दंड आकारला नाही पण त्याला समज देण्यात आली असून त्याने चूक मान्य केली आहे. आवेशने आयपीएल आचारसंहितेचा लेव्हल-1 गुन्हा 2.2 मान्य केला आहे. आचारसंहितेच्या लेव्हल-1 भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम असतो.

अखेरच्या चेंडूवर लखनौचा विजय काल झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौने ९ गडी गमावून २१३ धावा करून विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर एक धाव काढून आवेश खानने संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह लखनौने ६ गुणांसह क्रमवारीत अव्वल स्थान गाठले. 

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत ५९ धावा आणि कर्णधार फाफ डू प्लेसिसने ४६ चेंडूत नाबाद ७९ धावांची खेळी केली. तर लखनौकडून मार्क स्टॉयनिस आणि निकोलस पूरन यांनी स्फोटक खेळी करून आरसीबीचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली. स्टॉयनिसने ३० चेंडूत ६५ आणि निकोलस पूरनने १९ चेंडूत ६२ धावांची मोठी खेळी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरएफ ड्यु प्लेसीसविराट कोहली
Open in App