बंगळुरू : विजयासाठी उत्सुक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स आयपीएलच्या सामन्यात उद्या एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यांचे लक्ष्य विजय मिळवून गुणतक्त्यात वरचे स्थान मिळवण्याकडे असेल. दोन्ही संघ अजून चारपैकी एकच सामना जिंकू शकलेला आहे. मागच्या सामन्यात बँगलोरला मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्सला कोलकाता नाईट रायडर्सने पराभूत केले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने केकेआरकडून झालेल्या पराभवानंतर पुढच्या सामन्यात पंजाबला पराभूत केले. त्यानंतर आरसीबीला राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला. आरसीबीला आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. मागच्या दोन्ही सामन्यात प्रत्येकी २०० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे महागडे ठरले. त्यांच्याकडून उद्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
दिल्लीकडे जेसन रॉय, गौतम गंभीर, रिषभ पंत, श्रेयस अय्यर व ग्लेन मॅक्सवेलसारखे फलंदाज आहेत. आरसीबीसाठी चांगली बाब म्हणजे विराट कोहली फॉर्ममध्ये आहे. त्याने रॉयल्सविरुद्ध ५७ व मुंबईविरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने आतापर्यंत १२२ धावा केल्या. मॅक्क्युलमला फारश्या धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे इंग्लंडच्या मोईन अलीला संधी मिळू शकते.
गंभीरचा संघ केकेआरकडून झालेल्या पराभव विसरण्यासाठी प्रयत्न करेल. तर दिल्लीने पहिल्या सामन्यात पंजाबकडून तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करला होता. त्यानंतर मुंबईवर विजय मिळवत पुनरागमन केले. (वृत्तसंस्था)
सामन्याची वेळ :
रात्री ८ वाजता
स्थळ : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु.