Join us  

राहुलऐवजी रोहितला संधी? आज भारतीय संघाची निवड

एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीतही अंतिम ११ जणांत स्थान मिळवू शकला नव्हता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 3:39 AM

Open in App

नवी दिल्ली : द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा गुरुवारी होईल. सलामीवीर लोकेश राहुलच्या अपयशाचा लाभ रोहित शर्मा याला होण्याची शक्यता आहे.

एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीतही अंतिम ११ जणांत स्थान मिळवू शकला नव्हता. हनुमा विहारी व अजिंक्य रहाणे यांनी क्रमश: पाचवे व सहावे स्थान निश्चित केल्यानंतर, रोहितला सलामीवीर म्हणून चाचपून पाहण्याचा व्यवस्थापनाचा विचार असावा. रोहित अखेरची कसोटी लढत २०१८ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

चेतेश्वर पुजारा तिसºया स्थानासाठी व कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानासाठी प्रथम पसंती आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार कोहली यांच्याकडे आता एकच पर्याय शिल्लक असेल, तो म्हणजे रोहितला सलामीवीर म्हणून आजमावून पाहणे. बंगालचा सलामीवीर अभिमन्यू इश्वरनने स्थानिक सामन्यांसोबतच ‘भारत अ’ कडून शानदार कामगिरी केली. निवड समितीने राहुलला घरी पाठविण्याचा निर्णय घेतल्यास, राखीव फलंदाज म्हणून इश्वरनला स्थान मिळू शकेल.

राहुलने ३० कसोटी डावांत ६६४ धावा केल्या. मयांक अग्रवालने मात्र संघात स्थान निश्चित केले. आता चर्चा केवळ दुसºया सलामीवीरासाठी असेल. त्यामुळे १५ सदस्यांच्या संघात रोहित आणि इश्वरन या दोघांनाही स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.टी२० विश्वचषक डोळ्यापुढे ठेवून, पुढील १३ महिने केवळ पांढºया चेंडूने खेळणाºया खेळाडूंना अधिक संधी देण्याचा ‘थिंक टँक’चा विचार आहे काय, हे देखील निवडीवरून स्पष्ट होणार आहे. भारतात कसोटी सामने असतील तर संघात एकच तज्ज्ञ यष्टिरक्षक असतो. रिषभ पंत पहिली पसंती असला तरीही रिद्धिमान साहा हा देखील संघाच्या योजनेचा भाग आहे.

रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन हे तीन फिरकी गोलंदाज आणि जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा हे वेगवान गोलंदाज सज्ज आहेत. शमीला विश्रांती दिल्यास अनुभवी उमेश यादव संघात राहू शकतो. तंदुरुस्त नसलेला भुवनेश्वर कुमार संघाबाहेर राहील. त्यामुळे अष्टपैलू हार्दिक पांड्याचे पुनरागमन होईल.