Join us  

IND Vs SL 3rd T20: रोहित शर्माकडून टॉसवेळी झाली चूक, म्हणाला...मला खूप सांभाळून बोलावं लागेल!

भारतीय संघ सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करत असून ज्यावेळी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार स्टेडियममध्ये आले होते त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून एक चूक घडली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 8:23 PM

Open in App

नवी दिल्ली-

भारत विरुद्ध श्रीलंका असा तिसरा ट्वेन्टी-२० सामना धर्मशाला येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. भारतीय संघ सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करत असून ज्यावेळी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार स्टेडियममध्ये आले होते त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून एक चूक घडली. रोहित शर्माला त्यानंतर 'मला खूप सांभाळून बोलावं लागेल', असं स्पष्टीकरण द्यावं लागलं. 

नाणेफेक श्रीलंकेनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर समालोचक मुरली कार्तिकनं श्रीलंकेच्या कर्णधाराला प्रश्न विचारले आणि संघातील बदल विचारले. श्रींलेकचा कर्णधार शनाका यानं त्याबाबतची सविस्तर माहिती दिली. पुढे रोहित शर्माला संघातील बदलांबाबत विचारण्यात आलं असतान त्यानं संघात करण्यात आलेले चार मोठे बदल सांगितले. यातच एक चुकीचं विधान रोहितनं केलं. पण त्याची चूक त्याला तिथंच लक्षात आली आणि त्यानं तातडीनं आपल्या विधानात सुधारणा करुन मिश्किलपणे मुरली कार्तिकला उत्तर दिलं. "इशान किशन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्यासोबतच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल देखील संघाबाहेर आहेत", असं रोहित म्हणाला. त्यानंतर तातडीनं रोहितनं आपल्या विधानात सुधारणा करत "माफ करा. बुमराह, चहल आणि भुवीला संघाबाहेर नव्हे, आजच्या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. मला खूप सांभाळून बोलावं लागेल", असं म्हटलं. त्यानंतर रोहित आणि मुरली कार्तिक यांच्यात हास्यकल्लोळ झाल्याचं पाहायला मिळालं. 

रोहित शर्मा नेहमीच त्याच्या विनोदाच्या टायमिंगसाठी देखील चर्चेचा विषय ठरतो. त्याचे असे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत असतात. रोहित पत्रकार परिषदेतही निर्माण झालेलं गंभीर वातावरण त्याच्या मजेशीर उत्तरानं हलकं करत असतो. रोहितच्या याच हटके अंदाजाचं दर्शन आजच्या टॉसवेळी झालं.

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआय
Open in App