रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...

एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार; सोशल मीडियाद्वारे दिला सर्वांना धक्का; इंग्लंड दौऱ्यापासून भारताला मिळणार नवा कर्णधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 01:44 IST2025-05-08T01:44:01+5:302025-05-08T01:44:08+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma takes sudden retirement from Test cricket; Was going to get a call-up during England tour... | रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...

रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : आयपीएल २०२५ अखेरच्या टप्प्यात असताना, तसेच इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यामुळे ३८ वर्षांच्या या खेळाडूच्या भविष्याविषयी वर्तविण्यात येणाऱ्या सर्व वावड्यांना पूर्णविराम मिळाला. रोहितने मागच्या वर्षी विश्वचषक जिंकताच टी-२० क्रिकेटमधून  निवृत्ती जाहीर केली होती. त्यामुळे तो आता केवळ एकदिवसीय सामने खेळताना दिसेल.

 इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला २० जूनपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५-२७ मोहिमेला भारत-इंग्लंड सुरुवात करणार आहेत. त्याआधीच, रोहितने निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय कसोटी संघाला नवा कर्णधार मिळेल. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ दरम्यान त्याच्या नेतृत्वात भारताला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत मायदेशात ०-३ असा दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारताला त्याच्या नेतृत्वात १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला. त्याची वैयक्तिक कामगिरीही  फारशी चांगली झाली नव्हती.  

 इंग्लंड दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघ निवडला जाईल तेव्हा या बैठकीत नव्या कसोटी कर्णधाराचाही निर्णय होईल. जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत हे कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.

कर्णधार म्हणून...
रोहितने २०२२ ते २०२४ दरम्यान २४ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी भारताने १२ सामने जिंकले, तर ९ वेळा भारताला पराभव पत्करावा लागला, तसेच तीन सामने अनिर्णीत राहिले होते.

काय म्हणाला रोहित...
इन्स्टाग्रामवर कसोटी कॅपसह फोटो शेअर करीत रोहितने लिहिले, ‘नर्वांना नमस्कार! मी केवळ शेअर करू इच्छितो की, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे! पांढऱ्या जर्सीत देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी फार सन्मानाची बाब ठरली! इतकी वर्षे दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी वनडेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत राहणार आहे!’

तेव्हा फेटाळले होते निवृत्तीचे वृत्त
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या अखेरच्या सामन्यात खराब फॉर्ममुळे स्वत: संघाबाहेर बसलेल्या रोहितने त्यावेळी निवृत्तीचे वृत्त फेटाळले होते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत त्याचे मतभेद असल्याची चर्चा रंगली. 
जुलैमध्ये गंभीर यांनी संघातील स्टार संस्कृती संपविण्याचे संकेत दिले होते. दोघांनीही मतभेदाच्या अफवा फेटाळल्या; पण गंभीर यांनी केवळ कामगिरी हाच निवडीचा मुख्य आधार असेल, असे वारंवार स्पष्ट केले होते.

Web Title: Rohit Sharma takes sudden retirement from Test cricket; Was going to get a call-up during England tour...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.