रोहित शर्मा मोठा खेळाडू होईल असे वाटले नव्हते- प्रशिक्षक दिनेश लाड

रोहितने घेतले कठोर परिश्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:29 AM2023-12-04T05:29:35+5:302023-12-04T05:30:20+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma never thought he would become a big player - coach Dinesh Lad | रोहित शर्मा मोठा खेळाडू होईल असे वाटले नव्हते- प्रशिक्षक दिनेश लाड

रोहित शर्मा मोठा खेळाडू होईल असे वाटले नव्हते- प्रशिक्षक दिनेश लाड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

निनाद भोंडे

नागपूर : भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा भविष्यात मोठा खेळाडू होईल असे मला कधीच वाटले नव्हते. तसेच, त्याच्या टी-२० मधील भविष्याची मला चिंता नाही. कारण टी-२० क्रिकेट हे क्रिकेट नसून ती एक करमणूक आहे. त्यामुळेच सहसा या प्रकारातले खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसत नाहीत, असे मत रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर यांना घडविणारे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केले. नागपूरला एका स्पर्धेकरिता आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. 

एखादा उदयोन्मुख खेळाडू भविष्यात भारताकडून खेळू शकतो याची चाहूल तुम्हाला आधीच लागते का, असे विचारले असता द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले, ‘खरं सांगायचे तर रोहित शर्मा भविष्यातील भारताचा सुपरस्टार असेल असे मला सुरुवातीला वाटले नव्हते. मात्र १६ वर्षांखालील एका स्पर्धेत त्याचा खेळ बघितल्यावर मला त्याच्यातला स्पार्क जाणवला. हा पठ्ठ्या काहीतरी चमत्कारिक फलंदाजी करतो, त्याचा टेम्परामेंट वेगळ्याच दर्जाचा आहे, याचा अनुभव मला आला. तिथून मग रोहितवर विशेष मेहनत घेण्याचा निर्णय घेतला. माझ्यासाठी सगळे खेळाडू सारखेच असतात. पण त्यातील काही स्वत:ला झोकून देऊन सराव करत असतात. अशातून मोठ्या खेळाडूंचा जन्म होतो.

शार्दूल ठाकूरबाबत बोलताना लाड म्हणाले, शार्दूलसुद्धा खूप मेहनती आहे. अनेकांना त्याच्यातल्या फलंदाजाची गेल्या १-२ वर्षांपासून ओळख झाली असली तरी मला तो किती आक्रमक फलंदाजी करू शकतो हे आधीपासूनच माहिती होते. हे खरं आहे की त्याने गोलंदाजीवर अधिक लक्ष दिले. मात्र, अफलातून फटके मारत धडाकेबाज फलंदाजी करण्याची त्याच्यात विशेष क्षमता आहे.

टीका करणे सोपे
कुठलाही खेळाडू अपयशी ठरला की त्याच्यावर सडकून टीका करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे रूढ झाला आहे. मात्र ज्या लोकांना कुठल्याही खेळाची संपूर्ण प्रक्रिया काय असते, खेळाडू रोज कोणत्या दिव्यातून जात असतात, याची कल्पना असते ते अशी जिव्हारी लागणारे स्टेटमेंट देत नाहीत. उगवत्या सूर्याला सलाम करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मात्र त्यासाठी प्रदक्षिणा घालणाऱ्या पृथ्वीची मेहनत आपल्याला दिसत नाही. खेळातली खरी प्रकिया जेव्हा आपल्या कळेल तेव्हा आपणसुद्धा नुसते हवेत टीकेचे बाण मारणार नाही, असेही शेवटी दिनेश लाड म्हणाले.

Web Title: Rohit Sharma never thought he would become a big player - coach Dinesh Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.