Join us  

ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा रचू शकतो विश्वविक्रम

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून षटकारांचे शतक पूर्ण करणारा रोहित हा पहिला फलंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 7:49 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा तडफदार सलामीवीर रोहित शर्मा हा नवी विश्वविक्रम रचण्याच्या तयारीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये रोहित विश्वविक्रम रचण्यासाठी सज्ज झाला असेल.

ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ट्वेन्टी-20 मालिकेत रोहितने चांगली फलंदाजी केली होती. या मालिकेत रोहितने काही विक्रम आपल्या नावावरही केले होते. पण आता या मालिकेत त्याला एक विश्वविक्रम खुणावत आहे. हा विश्वविक्रम रचण्यासाठी रोहितला गरज आहे ती फक्त दोन षटकारांची.

 

ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून षटकारांचे शतक पूर्ण करणारा रोहित हा पहिला फलंदाज आहे. आतापर्यंत भारताच्या एकाही फलंदाजाला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये  शंबर षटकार लगावता आलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र रोहितच्या पुढे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा मार्टिन गप्तिल हे दोन फलंदाज आहे. या दोघांच्या नावावरही प्रत्येकी 103 षटकार आहे. रोहितच्या नावावर सध्या 102 षटकार आहेत. त्यामुळे रोहित या दोघांपेक्षा एक षटकार पिछाडीवर आहे. रोहितने जर एक षटकार लगावला तर तो या दोघांशी बरोबरी करू शकतो. पण रोहितने जर या मालिकेत दोन षटकार लगावले तर त्याच्या नावावर ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा विश्वविक्रम होऊ शकतो.

न्यूझीलंडमध्ये रोहितने रचला होता विक्रम

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडवर दुसऱ्या ट्वेंटी-20 लढतीत सात विकेट्स राखून विजय मिळवला होता.  भारताचा गेल्या दहा वर्षांतील न्यूझीलंडमधील हा पहिला विजय ठरला. 2009 साली भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दोन ट्वेंटी-20 सामने खेळला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. या विजयाबरोबर भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. या विजयासह कर्णधार रोहित शर्माने एका विक्रमात विराट कोहली व महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. कर्णधार म्हणून पहिल्या 14 सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत रोहित अव्वल ठरला आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात सात विकेट राखून विजय मिळवला. रोहितने शुक्रवारच्या सामन्यात 29 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 50 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. यापूर्वी हा विश्वविक्रम न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलच्या नावावर होता. रोहितच्या 2288 धावा झाल्या आहेत. गुप्तीलच्या नावावर 2272 धावा आहेत. रोहितने पाकिस्तानच्या शोएब मलिकलाही मागे सोडले. या विक्रमाव्यतिरिक्त रोहितने आणखी एक विक्रम नावावर केला. त्याने भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक 12 सामने जिंकण्याच्या कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, कर्णधार म्हणून पहिल्या 14 सामन्यांत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या खेळाडूंत रोहितने कोहली व धोनीलाही मागे टाकले. या दोघांनी पहिल्या 14 सामन्यांत प्रत्येकी 8 सामने जिंकले होते. रोहितने मात्र 12 सामने जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद व ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क यांच्याशी बरोबरी केली आहे.  

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया