Join us  

विराट कोहलीला बाद केल्यानंतर रोहितने मलिंगाला मारली मिठी

विराट कोहलीला 131 धावांवर मलिंगानं मुनावीराकरवी झेलबाद केलं. कोहली बाद झाल्यावर रोहित शर्मानं मलिंगाला मिठी मारली आणि

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2017 7:04 AM

Open in App

कोलंबो, दि. 1 : कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजाच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 168 धावांनी धुव्वा उडववत विजयी चौकार लगावला. या शानदार विजयासह भारताने 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने श्रीलंकेसमोर 376 धावांचे आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीनं 76 चेंडूत दमदार शतक साजरं केलं. शतकानंतर विराट कोहलीची फटकेबाजी आधिक आक्रमक झाली. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर प्रेमदासा स्टेडिअमवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळाले. विराट कोहलीला 131 धावांवर मलिंगानं मुनावीराकरवी झेलबाद केलं. कोहली बाद झाल्यावर रोहित शर्मानं मलिंगाला मिठी मारली आणि त्याचे अभिनंदन केले.

धक्का बसला ना, पण याचं कारण तुम्हांला समजल्यावर तुम्हांलाही रोहित बरोबर आहे असे वाटेल. झालं असं की, मलिंगानं विराटला बाद करताच त्याच्या आंतरराष्ट्रीय करियरच्या 300 विकेट पुर्ण झाल्या. या सामन्यात मलिंगा स्वत: कर्णधार होता. शतकवीर कोहलीला बाद करुन मलिंगाने आपल्या बळींचे त्रिशतक पूर्ण केले. दिग्गज मुथय्या मुरलीधरननंतर (५३४) अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा दुसरा, तर जगातील एकूण १३ वा गोलंदाज ठरला.

मलिंगाने विराटला बाद केल्यावर रोहित शर्मा याने त्याचे अभिनंदन केले. त्यावेळी त्याने मलिंगाला मिठी मारली. हे दृश्य पाहिल्यावर भारतीय प्रेक्षक हैराण झाले की हे काय झाले. पण जेव्हा समजले की मलिंगाने 300 विकेट घेतल्या त्यानंतर प्रेक्षकांचे कोडे सुटले. त्यानंतर क्रिजवर आलेल्या हार्दिक पांड्यानेही मलिंगाचे अभिनंदन केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटीझन्सने यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मलिंगा आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स या संघात खेळतो. त्यामुळे आपल्या आयपीएलच्या संघातील सहकाऱ्याच्या यशाबद्दल रोहितनं अभिनंदन केले.

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ५ बाद ३७५ धावांचा एव्हरेस्ट उभारला. कर्णधार आणि उपकर्णधाराच्या जोडीने यजमानांची जबरदस्त धुलाई करताना त्यांचे मानसिक खच्चीकरण केले. यानंतर भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचा डाव ४२.४ षटकांत २०७ धावांमध्ये संपुष्टात आला. विशेष म्हणजे, घरच्या मैदानावर लंकेचा हा सर्वांत मोठा पराभव ठरला. माजी कर्णधार अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज (७0) शिवाय श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. मिलिंदा सिरिवर्दनाने (३९) त्यातल्या त्यात काहीशी झुंज दिली.

सर्वाधिक शतकामध्ये विराट तिसऱ्या स्थानीकर्णधार विराट कोहलीने कोलंबोत श्रीलंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत २९वे वेगवान शतक ठोकले. त्याने ७६ चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह शतक गाठले. यासोबतच वन-डेत सर्वाधिक शतके ठोकणाºया खेळाडूंमध्ये तो तिसºया स्थानी आला. कोहली यंदा सर्वांत वेगवान शतक गाठणारा खेळाडूदेखील ठरला. त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याला (२८ शतके) मागे टाकले. सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह अव्वल स्थानी, तर आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ३० शतकांसह दुसºया स्थानावर आहे.धोनी ३००च्या क्लबमध्येमाजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आज ३०० वा वन-डे खेळणारा भारताचा सहावा तसेच जगातील २०वा खेळाडू बनला. लंकेविरुद्ध चौथ्या वन-डेत ही कामगिरी करताच माजी दिग्गज सचिनसह संघाचा कर्णधार विराट कोहली, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा यांनी माहीचे अभिनंदन केले. धोनीने भारताकडून २९७ तसेच तीन सामने आशिया एकादशकडून खेळले आहेत. आज त्याने नाबाद ४९ धावा केल्या. वन-डेत शंभर अर्धशतकांची नोंद करण्याची त्याला आजच संधी होती, पण एका धावेमुळे ही संधी हुकली. ४६३ वन-डे खेळलेल्या सचिनने ३००वेळा वन-डे कॅप घालणे ही अप्रतिम कामगिरी आहे, या शब्दांत धोनीचे कौतुक केले.

टॅग्स :क्रिकेटविराट कोहलीरोहित शर्माश्रीलंका