Join us  

रोहित-धवन यशस्वी सलामीची जोडी

इंग्लंडमध्ये असणार सर्वांचे लक्ष : भारताच्या विजयाचा पाया रचण्याची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 4:28 AM

Open in App

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारताच्या आघाडीच्या फळीत फलंदाजीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे रोहित शर्माशिखर धवन सध्या जगातील सर्वांत यशस्वी सलामीची जोडी म्हणून विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत आहेत.रोहित व धवन यांनी आतापर्यंत १०१ एकदिवसीय सामन्यात ४,५४१ धावांची भागीदारी केलेली आहे. गेल्या १० वर्षांत कुठल्याही सलामीच्या जोडीची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या दोघांनी आतापर्यंत १५ शतकीय आणि १३ अर्धशतकीय भागीदारी केलेल्या आहेत.

आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली खेळल्या गेलेल्या गेल्या विश्वचषक स्पर्धेतील आकडेवारीवर नजर टाकली तर रोहित व धवन जगभरातील सलामी जोड्यांच्या तुलनेत अव्वल आहेत. भारतीय जोडीने या चार वर्षांत ६० सामन्यात २६०९ धावा केलेल्या आहेत. त्यात ८ शतकी व ७ अर्धशतकी भागीदारींचा समावेश आहे.

या चार वर्षांत सलामीवीर फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा रोहितने फटकावल्या आहेत. त्याने ७१ सामन्यांत ६१.१२ च्या सरासरीने ३,७९० धावा केल्या आहेत. त्यात १५ शतके व १६ अर्धशतकांचा समावेश आहे. धवन या यादीत ६७ सामन्यांत २८४८ धावांसह चौथ्या स्थानी आहे.विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या सलामीवीर फलंदाजांच्या कामगिरीचा विचार करता वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (९८५० धावा), दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला (७८८०) आणि बांगलादेशचा तमिम इक्बाल (६६३६) यांनी सलामीवीर म्हणून रोहितच्या (६०४३) तुलनेत अधिक धावा केल्या आहेत, पण रोहितने प्रदीर्घ काळ मधल्या फळीत फलंदाजी केलेली आहे, हे विसरता येणार नाही. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या २०६ एकदिवसीय सामन्यांपैकी १०३ सामन्यांत मधल्या फळीत फलंदाजी केलेली आहे.

रोहितने जानेवारी २०१३ पासून नियमितपणे सलामीवीराची भूमिका बजावली आहे. त्यानंतर सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा (६०१४) त्याच्या नावावर नोंदविल्या गेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी धवन (५२८६), अमला (४६७६), क्विंटन डिकॉक (४४९३), मार्टिन गुप्टील (४२६४) आणि अ‍ॅरोन फिंच (४०१२) यांचा क्रमांक येतो. (वृत्तसंस्था)

क्रिकेट महाकुंभात सहभागी होत असलेल्या अन्य देशांच्या सलामीच्या जोड्यांच्या गेल्या विश्वकप स्पर्धेतील कामगिरीचा विचार केला तर रोहित व धवन यांच्यानंतर दक्षिण आफ्रिकेची जोडी अमला व डिकॉक (२४४२ धावा), इंग्लंडची जोडी जॉनी बेयरस्टॉ व जेसन रॉय (१६७५), आॅस्ट्रेलियाची जोडी फिंच व डेव्हिड वॉर्नर (१३५०), पाकिस्तानची जोडी फखर जमा व इमाम उल-हक (१२६९) आणि बांगलादेशची जोडी तमिम इक्बाल व सौम्य सरकार (११५५) यांना गेल्या चार वर्षांत एक हजारपेक्षा अधिक धावा फटकावता आलेल्या आहेत.

टॅग्स :रोहित शर्माशिखर धवन