Join us  

Road Safety World Series : "परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन…" विस्फोटक खेळीनंतर वीरूने सचिनबाबत केले भन्नाट ट्विट

Virender Sehwag tweets about Sachin Tendulkar after explosive inning :

By बाळकृष्ण परब | Published: March 06, 2021 9:07 AM

Open in App

रांची - रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) काल इंडियन लिजंड्स आणि बांगलादेश लिजंड्स यांच्यात झालेल्या लढतीत क्रिकेटप्रेमींना वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) तुफानी फटकेजाबीचा आनंद पुन्हा एकदा घेता आला. निवृत्तीनंतरही पूर्वीचा आक्रमक बाणा आपल्यामध्ये कायम असल्याचे दाखवून देताना वीरूने या सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत नाबाद ८० धावा कुटल्या. दरम्यान, विस्फोटक खेळीनंतर वीरूने केलेले तितकेच धमाकेदार ट्विटही चर्चेत आले आहे. या ट्वीटमध्ये वीरूने सचिन तेंडुलकरसोबत (Sachin Tendulkar) पुन्हा एकदा सलामीला खेळतानाचा अनुभव शेअर केला आहे. ("Parampara, Pratishtha, Anushasan" Virender Sehwag tweets about Sachin Tendulkar after explosive inning )

बांगलादेश लिजंड्सविरुद्धच्या सामन्यात ११० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकेकाळची क्रिकेटमधील सुपरहिट जोडी असलेल्या वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने तोच जुना अवतार दाखवला. या जोडीने या आव्हानाचा केवळ १०.१ षटकांतच यशस्वी पाठलाग केला. दरम्यान, सामन्यानंतर वीरेंद्र सेहवाने सचिन तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा सलामीला उतरण्याचा अनुभव ट्विट करून शेअर केला आहे. या ट्विटमध्ये वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन. दुसऱ्या बाजूने सचिन पाजी उभे असताना फटकेबाजी करण्याचा अनुभाव काही औरच असतो.

दरम्यान, या सामन्यापूर्वी वीरूने इंग्लंडविरुद्ध आक्रमक शतकी खेळी करणाऱ्या रिषभ पंतचेही कौतुक केले होते. आज मी रिषभ पंतला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप करून चौकार मारताना आणि नंतर षटकार ठोकून शतक पूर्ण करताना पाहिले. दॅट्स माय बॉय! अरी दादा! मजौ आगौ!! अशा शब्दात सेहवागने पंतचे कौतुक केले. 

दरम्यान, बांगलादेश संघाला प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकांत 109 धावच करता आल्या. युवराज सिंग ( 2/15), प्रग्यान ओझा ( 2/12) आणि विनय कुमार ( 2/25) यांनी टीम इंडियासाठी दमदार कामगिरी केली. बांगलादेशकडून नझीमुद्दीननं 33 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारासह 49 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात वीरूच्या फटकेबाजीनं बांगलादेशच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. मोहम्मद रफिकच्या पहिल्याच चेंडूवर वीरूनं त्याच्या स्टाईलनं चौकार खेचला. पहिल्याच षटकात वीरूनं 4,4,6,0,4,1 अशा 19 धावा कुटल्या.  त्यानं 35 चेंडूंत 10 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या. सचिन तेंडुलकर 26 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 33 धावांवर नाबाद राहिला. वीरूनं सुरुवात चौकारानं केली, तर शेवट षटकारानं केला. त्याच्या 80 धावांमधील 70 धावा या फक्त चौकार-षटकारांनी आल्या.

टॅग्स :विरेंद्र सेहवागसचिन तेंडुलकरटी-20 क्रिकेट