Join us  

'आयपीएल मे मिलेंगे'... रिषभ पंतचं 'माही भाई'ला भारी चॅलेंज

भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 3:04 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात महेंद्रसिंग धोनीचा वारसदार म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात आहे. पंतनेही अल्पावधीतच सातत्यपूर्ण कामगिरी करून संघातील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत पर्यायी यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकऐवजी पंतची निवड करण्यात आलेली आहे. वर्ल्ड कप संघातही धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतच्याच नावाचा विचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच पंत आता थेट कॅप्टन कूल माहीला चॅलेंज देऊ लागला आहे. पंतने शनिवारी एक व्हिडीओ ट्विट करून थेट धोनीला आव्हान केले. 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) वेळापत्रकाची प्रतीक्षा सर्वांना लागली होती. लोकसभा निडवणूका आणि आयपीएल हे एकाच वेळी होत असल्यामुळे भारतीय नियामक मंडळासमोर ( बीसीसीआय) वेळापत्रक ठरवताना पेच निर्माण झाला होता. पण, बीसीसीआयनं यावर तोडगा म्हणून पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले. महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई  सुपर किंग्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. 26 मार्चला दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई यांच्यात सामना होणार आहे आणि या सामन्यात धोनीला सज्ज राहण्याचे आव्हान पंतने केले आहे.

मे-जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. 23 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याची घोषणा  बीसीसीआयने केली होती.  30 मे ते 14 जून या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्याची तारेवरची कसरत बीसीसीआयला करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

तो म्हणाला,'' माही भाई हे मला गुरू समान आहेत. तो नसता तर मी यष्टिरक्षक-फलंदाज झालो नसतो. पण, यावेळी त्याच्या संघाविरुद्ध मी अशी फटकेबाजी करेन की, कॅप्टन कूल माही कूल राहणार नाही. माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येत आहे.'' 

टॅग्स :रिषभ पंतमहेंद्रसिंह धोनीआयपीएल 2019आयपीएलचेन्नई सुपर किंग्सदिल्ली डेअरडेव्हिल्स