T20 World Cup 2022 : ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे 2020मध्ये ऑस्ट्रेलियात होणारी स्पर्धा स्थगित करण्यात आली होती आणि मागील वर्षी UAE मध्ये झालेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. त्यामुळे 2022च्या वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 2022चा वर्ल्ड कप कोण जिंकेल, याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे आणि दोन वेळा कर्णधार म्हणून वर्ल्ड कप जिंकणाऱ्या रिकी पाँटिंगने ( Ricky Ponting) मोठा दावा केला आहे.
पाँटिंग हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा सहाय्यक प्रशिक्षक होता आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षकही आहेत. ICC ला दिलेल्या मुलाखतीत पाँटिंगने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2022 ची फायनल होईल, अशी भविष्यवाणी केली आहे. ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये भारताला पराभूत करेल, असेही त्याने म्हटले आहे. तो म्हणाला,''भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होईल आणि ऑस्ट्रेलिया बाजी मारेल. गतविजेत्यांना घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचा फायदा मिळेल.''
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मार्गात इंग्लंड हा मुख्य अडथळा ठरू शकतो, असेही पाँटिंगने म्हटले. तो म्हणाला, ''मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंडची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया व भारत यांच्या मार्गात हा मोठा अडथळा ठरू शकतो. ''
पाकिस्तानचा माजी दिग्गज वकार युनिस याने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान बाजी मारू शकतो, असा विश्वास व्यक्त केला होता, परंतु पाँटिंगचं मत काही वेगळं आहे. पण, पाँटिंगने शाहिन आफ्रिदी, मोहम्मद रिझवान आणि बाबर आजम यांचे कौतुक केले आहे. ''बाबर आजमची कामगिरी चांगली झाली नाही, तर मला वाटत नाही की पाकिस्तान जिंकू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बाबर आजमचा खेळ मी जवळून पाहिला आहे आणि मी तेव्हाही म्हणालो होतो, या फलंदाजासमोर आकाशही ठेंगणे आहे. वर्ष सरत जाईल, तसतसे त्याचा खेळ उंचावत जाईल.''
''सलामीवीरांची कामगिरी आणि नवीन चेंडूंवर जलदगती गोलंदाजीही महत्त्वाची आहे, परंतु ऑस्ट्रेलियात फिरकी गोलंदाजी फार प्रभावी ठरणारी नाही,''असेही पाँटिंगने म्हटले.