2 Runs All Out, Cricket Match: क्रिकेटला 'अनिश्चिततेचा खेळ' म्हणले जाते. क्रिकेटच्या मैदानात कधी मोठा विक्रम होईल किंवा कधी काहीतरी विचित्र बाब घडेल हे कोणालाही माहिती नसते. अगदी त्याचप्रमाणे इंग्लंडमध्ये अलिकडेच झालेल्या एका सामन्यात वेगळाच प्रकार घडला. एक संघ फलंदाजीसाठी आला आणि संपूर्ण संघ फक्त २ धावांवर बाद झाला. तुम्हाला हे वाचून एखादा विनोद ऐकल्यासारखे वाटेल, पण हे खरेच घडले आहे आणि त्याने क्रिकेट जगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कुठे घडला हा प्रकार?
इंग्लंडमधील हा विचित्र प्रकार मिडलसेक्स काउंटी क्रिकेट लीगमध्ये घडला. तिथे रिचमंड क्रिकेट क्लबचा फोर्थ इलेव्हन संघ (Richmond CC 4th XI) यांचा सामना नॉर्थ लंडन क्रिकेट क्लब थर्ड इलेव्हनशी (North London CC 3rd XI) झाला. प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ लंडनने ४५ षटकांत ४२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना रिचमंड संघ सामना हरेल अशी अपेक्षा होती, पण परिस्थिती इतकी वाईट होईल असे कोणीही विचार केला नव्हता. रिचमंडचे फलंदाज मैदानात उतरले आणि काही वेळातच संपूर्ण संघ फक्त २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.
अवघ्या २ धावांवर रिचमंड संघ 'ऑलआउट'
सामन्यात नॉर्थ लंडनने प्रथम फलंदाजी करताना डॅन सिमन्सने १४० धावा केल्या. तर जॅक लेविथने ४३ आणि नेव्हिल अब्राहमने ४२ धावांचे योगदान दिले. त्यामुळेच नॉर्थ लंडनने ४५ षटकांत ६ गडी गमावून ४२६ धावांची मोठी धावसंख्या उभारली. रिचमंडच्या संघाला जिंकण्यासाठी ४२७ धावा करायच्या होत्या. पण, त्यांची सुरुवात खराब झाली आणि एकामागे एक फलंदाज बाद होत गेले. संपूर्ण संघ ५.४ षटकांत (फक्त ३४ चेंडूत) २ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. या २ धावांपैकी १ धाव वाईड बॉलची होती. म्हणजेच बॅटने फक्त १ धाव निघाली.
९ फलंदाज शून्यावर बाद
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रिचमंडचे ९ फलंदाज शून्यावरच बाद झाले. नॉर्थ लंडनचा गोलंदाज मॅट रोसनने शानदार गोलंदाजी केली. त्याने एकही धाव न देता ५ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीमुळे, नॉर्थ लंडन संघाने ४२४ धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.
Web Title: richmond cc team allout 2 runs while chasing 427 runs target shocking cricket match scorecard
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.