लंडन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट होण्यासाठी सहा आठवड्यांची विश्रांती देण्यात आली आहे. या कालावधीत तो क्रिकेटपासून पूर्णपणे दूर राहील.
इंग्लंड अँड वेल्स बोर्डाने आज याची माहिती देताना स्पष्ट केले की, देशातर्फे सर्वाधिक कसोटी बळी घेणारा लंकाशायरचा हा स्विंग गोलंदाज या कालावधीत क्रिकेटपासून दूर राहील आणि या कालावधीचा तो खांद्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी उपयोग करेल. अँडरसनने १३८ कसोटी सामन्यात ५४० बळी घेतले आहे. तो लंकाशायरतर्फे दोन कौंटी सामने खेळणार नाही. भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला १ आॅगस्टपासून प्रारंभ होत असून ही मालिका सहा आठवडे चालणार आहे. या मालिकेपूर्वी अँडरसन पूर्णपणे फिट व्हावा, असे इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅव्हर बेलिस म्हणाले. अँडरसन आता वन-डे आंतरराष्ट्रीय सामना खेळता नाही. बेलिस म्हणाले, ‘भारताविरुद्ध आम्हाला १ आॅगस्टपासून सहा आठवड्यांत पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. आमच्या गोलंदाजांसाठी हे खडतर आव्हान आहे. मालिकेसाठी अँडरसन पूर्णपणे फिट असावा, असे आम्हाला वाटते.’ (वृत्तसंस्था)
भारताचे पारडे वरचढ - चॅपेल
नवी दिल्ली : ‘इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडे विजय मिळविण्याची सर्वोत्तम संधी आहे. कारण यजमान संघाला अनेक आघाड्यांवर अपेक्षित यश मिळत नाही,’ असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयान चॅपेलने व्यक्त केले आहे.
चॅपेलने म्हटले की, ‘भारताकडे इंग्लंड व आॅस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची चांगली संधी आहे. लॉर्ड््सवर पाकिस्तानविरुद्धच्या पराभवामुळे इंग्लंड संघाला धक्का बसला आहे.’ (वृत्तसंस्था)