ठळक मुद्दे नॉर्दन वॉरियर्स संघाने टी-10 लीगमध्ये पंजाबी लिजंड्सविरुद्धचा सामना गाजवला.टी-10मधील वॉरियर्सचा सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रमनिकोलस पूरणनेही मोडला वैयक्तिक विक्रम
शारजा, टी-10 लीग : नॉर्दन वॉरियर्स संघाने टी-10 लीगमध्ये पंजाबी लिजंड्सविरुद्धचा शुक्रवारचा सामना गाजवला. निकोलस पुरण, लेंडस सिमोन्स, आंद्रे रसेल आणि रोव्हमन पॉवेल या कॅरेबियन खेळाडूंनी षटकारांची आतषबाजी केली. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वॉरियर्सने 10 षटकांत 2 बाद 183 धावा चोपल्या. ही टी-10 लीगमधील सर्वोत्तम खेळी ठरली. याच सामन्यात निकोलसने 77 धावा करताना लीगमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर केला. वॉरियर्सने हा सामना 99 धावांनी जिंकला.
वॉरियर्सने पाच षटकांतच शतकी उंबरठा गाठला होता. निकोलसला दिलेले जीवदान लिजंड्स संघाला महागात पडले. त्याने 19 चेंडूंत तब्बल 9 षटकारच खेचले होते. त्याला दुसऱ्या बाजूने सिमोन्सची साजेशी साथ मिळाली. सहाव्या षटकार सिमोन्स ( 36) बाद झाला. निकोलसने षटकारांची आतषबाजी कायम ठेवली. त्याची 25 चेंडूंत 77 धावांची वादळी खेळी 9 व्या षटकात संपुष्टात आली. या खेळीत त्याने 10 षटकार व दोन चौकार लगावले. आंद्र रसेल आणि रोव्हमन पॉवेल यांनी तुफान फटकेबाजी करताना शेवटच्या 11 चेंडूंत 53 धावा कुटल्या. दोघांनी वॉरियर्सला 183 धावांचा पल्ला गाठून दिला. रसेलने 9 चेंडूंत 6 षटकार खेचून नाबाद 38, तर पॉवेलने 5 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 21 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचे सलामीचे दोन फलंदाज 33 धावांवर माघारी परतले. दडपणाखाली खेळणाऱ्या लिंजड्सचे फलंदाज औपचारिकता म्हणून मैदानावर उतरले होते. त्यांच्या पाच षटकांत 3 बाद 39 धावा झाल्या होत्या. पन्नासीच्या आत लिजंड्सचा निम्मा संघ तंबूत पाठवण्यात वॉरियर्सला यश आले.
लिजंड्सला 10 षटकांत 7 बाद 84 धावा करता आल्या.