Join us  

हार्दिक जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज

रोहित शर्मा : मर्यादित षटकांच्या सामन्यात योगदान देईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 1:35 AM

Open in App

अहमदाबाद : अष्टपैलू हार्दिक पांड्या प्रत्येक जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज होत आहे. तो संघाला महत्त्वपूर्ण योगदान देईल, अशी अपेक्षा भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी व्यक्त केली. पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर हार्दिक इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी करेल, असा विश्वास असल्याचे मत रोहितने व्यक्त केले.

पांड्याच्या पाठीवर ऑक्टोबर २०१९ मध्ये शस्त्रक्रिया झाली. मागच्यावर्षी आयपीएलदरम्यान त्याने मैदानावर पुनरागमन केले पण गोलंदाजी करू शकला नव्हता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याने मॅचविनरसारखी कामगिरी केली, तथापि तीन वन डे आणि तीन टी-२० सामन्यात त्याने एकदाच गोलंदाजी केली होती. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतही त्याला संघात स्थान देण्यात आले होते, यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज होण्यास मदत मिळाली, असा विश्वास रोहितने व्यक्त केला.शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्याआधी रोहित म्हणाला, ‘निश्चितपणे हार्दिक हा संघात महत्त्वाचा खेळाडू आहे. तो फलंदाजी आणि गोलंदाजीवर मेहनत घेत आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य येईल, असे वाटते. त्याने स्वत:कडून अनेक प्रयत्न केल्यामुळे सध्या तो सर्व जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाल्याचे दिसत आहे. 

विराट, रोहित यांना विक्रमाची संधीकर्णधार विराट कोहलीने  ८५ सामन्यात २ हजार ९२८ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराटला ३ हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.  या मालिकेत १७ धावा पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा करणारा तो तिसरा कर्णधार बनेल. रिकी पॉन्टिंगने कर्णधार म्हणून सर्वाधिक १५ हजार ४४० तर ग्रॅमी स्मिथने १४ हजार ८७८ धावा केल्या आहेत.  या मालिकेत रोहितने १३ षटकार मारल्यास आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर होऊ शकतो. रोहितने १२७ षटकार मारले आहेत. काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तिलने रोहितला मागे टाकत हा विक्रम स्वत:च्या नावावर केला होता. 

टॅग्स :हार्दिक पांड्या