बंगळुरु : सलामीचा सामना गमावल्यानंतर विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघ शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळेल. सलामीला आरसीबीला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सला सहजपणे नमवून यंदाच्या सत्राची दिमाखात सुरुवात केली आहे.
दरम्यान, या सामन्यात पंजाबचा विध्वंसक फलंदाज ख्रिस गेल आकर्षणाचे केंद्र असेल. याआधीचा सत्रांमध्ये आरसीबीचा प्रमुख फलंदाज असलेला गेल यंदा पंजाबकडून खेळत आहे. पहिल्या सामन्यात गेलला खेळविले नसले, तरी या सामन्यात पंजाब त्याला नक्की खेळविण्याची शक्यता आहे. बंगळुरुची खेळपट्टी पूर्णपणे ओळखून असलेल्या गेलच्या अनुभवाचा फायदा पंजाब करुन घेईल, यात शंका नाही.