एबी डिव्हिलियर्स लिहितो...
गेले चार दिवस माझ्यासाठी परिश्रमाचे ठरले. मी व्हायरलशी झुंज देत होतो. हॉस्पिटलला जाण्यासाठी बाहेर पडण्याचा एक अपवाद वगळता मी सतत हॉटेलच्या खोलीतच पडून होतो. झोप लागत नव्हतीच शिवाय डोकेदुखीमुळे त्रस्त झालो होतो. आता तब्येत सुधारत आहे. झोपदेखील चांगली लागते. पुण्यात शनिवारी सुपरकिंग्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात आरसीबीसाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे.
आठपैकी पाच सामन्यात पराभव आणि तीन विजय अशा वाटचालीसह आम्ही गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहोत. क्षमतेनुसार आम्ही अद्याप कामगिरी केलेली नाही, तरीही प्ले आॅफ शर्यतीत कायम आहोत, आमच्याकडून सर्वश्रेष्ठ कामगिरी अद्यापही व्हायची असल्याचे माझे प्रांजळ मत आहे. मी दोन सामन्यात बाहेर बसलो. हे दोन्ही सामने टीव्हीवर पाहिले. अनेकदा वेदनांमुळे केवळ डोळे उघडे ठेवून मी सामना पाहात होतो.
आमच्या संघात लढवय्यी वृत्ती आहे. अखेरच्या काही षटकांत आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीत कमी पडत असलो तरी झुंझण्याची अप्रतिम क्षमता संघात पहायला मिळाली. केकेआरविरुद्ध आम्ही संतुलित कामगिरी केली. फिल्डिंगने मात्र निराशा केली. मोक्याच्या क्षणी झेल टिपायलाच हवे, याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही.
मुंबईविरुद्ध संघाने सरस कामगिरी केली. आमचे क्षेत्ररक्षणही सुधारले. अपेक्षेनुसार लहान धावसंख्येचा बचाव करण्यातही यश आले. गतविजेत्यांविरुद्ध विजय मिळविणे महत्त्वपूर्ण ठरले. शिस्तप्रिय गोलंदाजी, साजेसे क्षेत्ररक्षण आणि आक्रमक फलंदाजी ही विजयाची त्रिसूत्री ठरली. आम्हाला प्रत्येक सामन्यात साहसीवृत्ती जोपासावी लागेल. काही गोष्टींवरील नियंत्रण शिथिल होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आगामी काही सामन्यात चुकांमधून बोध घेऊन कामगिरी उंचावू शकलो तर आनंदाचे दिवस येणारच आहेत. (टीसीएम)