-एबी डिव्हिलियर्स लिहितो...
हा असा दिवस होता की, तुम्ही अखेरच्या पाच षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरता आणि संघाचा डाव १५ षटकांत गुंडाळता. सोमवारी इंदूरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या आमच्या लढतीत असेच घडले. या विजयामुळे प्लेआॅफसाठी पात्र ठरण्याचे आमचे स्वप्न व आशा कायम आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा असे वाटले की काहीच आमच्या मनाप्रमाणे घडत नाही, पण आता मात्र काहीच चुकीचे होत नसल्याचे वाटत आहे.
अखेरचे चारही सामने जिंकायचे आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. दरम्यान, अद्याप बरेच काही शिल्लक आहे. चारपैकी दोन सामने आम्ही जिंकले असून आता दोन शिल्लक आहेत. गृहमैदानावर आम्हाला सनरायजर्स आणि बाहेरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळायचे आहे. काहीही घडू शकते, पण आम्ही लढणार मात्र नक्की. यंदाच्या मोसमात आमच्या गोलंदाजांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले, पण गरज असताना त्यांनी अचूक टप्पा व दिशा राखून गोलंदाजी केली. किंग्स इलेव्हन पंजाबच्या आघाडीच्या फळीला माघारी परतवत उमेश यादवने आमच्यासाठी विजयाचा पाया उभारला. आमच्या क्षेत्ररक्षकांनीही दडपण कायम राखले. आम्ही तीन फलंदाजांना धावबाद केले आणि पंजाबचा डाव १५.१ षटकांत ८८ धावांत गुंडाळला. विराट कोहली व पार्थिव पटेलने आक्रमक प्रत्युत्तर दिले आणि आम्ही ८.१ षटकांत गडी न गमावता लक्ष्य गाठले. आम्ही नेटरनरेटमध्ये सुधारणा करताना आगामी लढतींसाठी प्रतिस्पर्धी संघाला इशारा दिला आहे. आरसीबी संघ आता शांत बसणार नाही. खेळाडू मानसिकदृष्ट्या कणखर आहेत. शनिवारी दिल्लीमध्ये खेळल्यानंतर सोमवारचा दिवस खडतर ठरला. वादळामुळे विमानसेवा विलंबाने सुरू होती. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत आम्हाला इंदूरमध्ये पोहोचता आले आणि मंगळवारी आम्ही सामना खेळला. सनरायजर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढती कठीण असतील, पण बऱ्याच निराशाजनक कालखंडानंतर आम्हाला थोडी लय गवसली आहे. विराटने इंदूरमध्ये जसे म्हटले होते की, सध्या आमची स्थिती अशी आहे की, आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि हीच बाब आमच्यासाठी उपयुक्त ठरली. आम्ही भविष्यात प्रदीर्घ काळ कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे. (टीसीएम)