बेंगळुरू : ‘प्ले आॅफ’चा मार्ग कसा सुकर करायचा या चिंतेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूपुढे आज गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सामना जिंकण्याचे आव्हान आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबवर मिळविलेल्या पाठोपाठ विजयांमुळे आरसीबीची ‘प्ले आॅफ’ची आशा जिवंत आहे. दुसरीकडे १२ पैकी ९ सामने जिंकणारा हैदराबाद आधीच ‘प्ले आॅफ’मध्ये दाखल झाला. आरसीबी सातव्या तर हैदराबाद अव्वल स्थानावर आहे.
विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीसाठी हे सत्र कठीण ठरले. १२ पैकी ७ सामने गमविल्यानंतर, मागच्या २ विजयामुळे मात्र त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या खऱ्या; पण अन्य निकालांवरही त्यांची वाटचाल विसंबून असेल.
यजमान संघ बºयाचअंशी कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्या कामगिरीवर विसंबून आहे. मोईन अली आणि कोरे अॅन्डरसन यांच्याकडूनही संघाला अपेक्षा असतील. कोहलीने १२ सामन्यांत ५१४ आणि डिव्हिलियर्सने १० सामन्यांत ३५८ धावा ठोकल्या आहेत. गोलंदाजांमध्ये उमेश यादवचे १७ बळी आहेत. सनरायझर्ससाठी सलामीवीर शिखर धवनने ३६९ आणि कर्णधार केन विलियम्सनने ५४४ धावा केल्या असून, त्याने संघात विजुगिषीवृत्तीचा संचार केला आहे. युसूफ पठाण (१८६), मनीष पांडे (१८९) आणि शाकीब अल हसन (१६६) यांनीही वेळोवेळी उपयुक्त खेळी केली. सनरायझर्सची ताकद त्यांची गोलंदाजी आहे. भुवनेश्वरच्या मार्गदर्शनात सर्व गोलंदाजांनी भेदक मारा केला आहे. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल आणि लेग स्पिनर राशीद खान यांनी प्रत्येकी १३ गडी
बाद केले, तर शाकीबने १२ व
संदीप शर्मा याने आठ गडी बाद केले आहेत. (वृत्तसंस्था)