Join us  

रवींद्र जडेजाची कमाल, शुभमन गिलची धमाल

स्टीव्ह स्मिथच्या शतकानंतरही ऑस्ट्रेलिया सर्वबाद ३३८, भारताचे २ बाद ९६ असे चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 4:49 AM

Open in App

सिडनी : अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने दमदार शतक झळकावताच तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात युवा शुभमान गिलच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने दुसऱ्या दिवसअखेर पारडे बरोबरीत आणल्याचे मानले जात आहे.

२०१९ नंतर पहिले आणि कारकिर्दीत २७ वे शतक साजरे करताना स्मिथने २२६ चेंडूत १६ चौकारांसह १३१ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ म्हणजे टीम इंडियाची डोकेदुखी हे समीकरण खरे ठरले आहे. मार्नस लाबुशेनने ९१ आणि युवा विल पुकोव्हस्की ६२ यांनीही चांगले योगदान दिले.रोहित शर्मा (२६) आणि गिल (५०) यांचे बळी देत दोन गड्यांच्या मोबदल्यात ९६ धावा उभारणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत २४२ धावांनी मागे आहे. खेळ संपला त्यावेळी चेतेश्वर पुजारा ९ आणि अजिंक्य रहाणे ५ हे नाबाद होते. खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त वाटत असल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

स्मिथने किल्ला लढवत शतक पूर्ण केले तर दुसऱ्या टोकाहून भारतीय गोलंदाजांनी नियमित फरकाने बळी टिपले. जडेजाने ६२ धावात चार तर बुमराह आणि सैनी यांनी प्रत्येकी दोन- दोन गडी बाद केले. सिराजने एक गडी बाद केला. रोहित आणि गिल यांनी सलामीला ७० धावांची भागीदारी केली. मागच्या दहा वर्षांत पहिल्यांदा विदेशात शतकी सलामी होईल असे वाटत असताना हेजलवूडच्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला.

१३ महिन्यात प्रथमच कसोटी खेळणाऱ्या रोहितची नाथन लियोनसोबत चढाओढ अनुभवाला मिळाली. रोहितने ऑफस्पनरविरुद्ध षटकार खेचल्यानंतर पुढच्या चेंडूवर शॉर्टलेगवर झेलबादचे त्याच्याविरुद्ध अपील झाले. डीआरएसमध्ये मात्र तो नाबाद ठरला. सहजपणे खेळणाऱ्या रोहितला हेजलवूडने स्वत:च्या जाळ्यात ओढले.गिलने शंभर चेंडूंचा सामना करीत अर्धशतक गाठले. त्यानंतर लगेचच कमिन्सच्या चेंडूवर त्याने ग्रीनकडे झेल दिला. दोन्ही सलामीवीर माघारी फिरताच यजमान गोलंदाज वरचढ झालेले दिसले. यावेळी मात्र पुजारा- रहाणे यांनी बचावात्मक पवित्रा घेत १२.५ षटकात केवळ ११ धावा केल्या. रहाणेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने पायचितसाठी रिव्ह्यूदेखील घेतला होता.त्याआधी २ बाद १६६ वरून सकाळी पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने अश्विन आणि जडेजा यांना वरचढ होऊ न देता आखूड टप्प्याच्या अनेक चेंडूवर धावा खेचल्या. सकाळच्या सत्रात दोनदा पावसाचा व्यत्यय आल्यानंतरही यजमान संघाने ५१ षटकात १७२ धावा काढल्या. लाबुशेन शतकाकडे वाटचाल करीत असताना जडेजाच्या चेंडूवर कर्णधार रहाणेने त्याचा स्लिपमध्ये झेल घेतला. मधल्या आणि तळाच्या फळीत मिशेल स्टार्क (२४) शिवाय अन्य फलंदाज फारसे प्रभावी ठरले नाहीत पण स्मिथ मात्र शतक गाठल्यानंतर अधिक आक्रमक खेळला. जडेजाच्या सुरेख थ्रोवर तो धावबाद होताच यजमानांचा डाव संपला.

स्मिथचे भारताविरुद्ध विक्रमी आठवे शतकपहिल्या दोन सामन्यात केवळ दहा धावा काढणाऱ्या स्टीव्ह स्मिथने तिसऱ्या सामन्यात १३१ धावा ठोकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक आठ शतकांचा विक्रम केला. त्याने सर गॅरी सोबर्स, सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराट कोहलीच्या २७ शतकांशीही त्याने बरोबरी केली आहे. सध्याच्या मालिकेत त्याचे हे (वन डे मालिकेत दोन शतके) तिसरे शतक ठरले. भारताविरुद्ध स्मिथने २५ डावांमध्ये आठ शतके ठोकली. सोबर्स यांना ३० डाव, रिचर्ड्स यांना ४१ डाव तर पॉन्टिंगला ५१ डाव लागले होते. सर एव्हर्टन विक्स यांनी भारताविरुद्ध अवघ्या १५ डावांत ७ शतके ठोकली होती.

धावफलक ऑस्ट्रेलिया पहिला डाव : विल पुकोव्हस्की पायचित गो. सैनी ६२, डेव्हिड वॉर्नर झे. पुजारा गो. सिराज ५, मार्नस लाबुशेन झे. रहाणे गो. जडेजा ९१, स्टीव स्मिथ धावबाद १३१, मॅथ्यू वेड झे. बुमराह गो. जडेजा १३, कॅमरून ग्रीन पायचित गो. ००, टिम पेन त्रि. गो.बुमराह १, पॅट कमिन्स त्रि. गो.जडेजा ००, मिशेल स्टार्क झे. गिल गो. सैनी २४, नाथन लियोन पायचित गो. जडेजा ००, जोश हेजलवूड नाबाद १, अवांतर १०. एकूण: (१०५.४ षटकात) सर्वबाद ३३८.गडी बाद क्रम : १/६, २/१०६, ३/२०६, ४/२३२, ५/२४९, ६/२५५, ७/२७८, ८/३१०, ९/३१५, १०/३३८. गोलंदाजी : बुमराह २५.४-६-६६-२, सिराज २५-४-६७-१, अश्विन २४-१-७४-०, सैनी १३-०-६५-२, जडेजा १८-३-६२-४.भारत पहिला डाव : रोहित शर्मा झे. आणि गो. हेजलवूड २६, शुभमन गिल झे. ग्रीन गो. कमिन्स ५०, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ९, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५, अवांतर ६. एकूण धावा : ४५ षटकात २ बाद ९६. गडी बाद क्रम : १/७०, २/८५. गोलंदाजी : स्टार्क ७-४-१९-०, हेजलवूड १०-५-२३-१, कमिन्स १२-६-१९-१, लियोन १६-७-३५-०. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया