Join us  

पारदर्शकतेअभावी जडेजा होता दु:खी; पुढील सत्रात सीएसके सोडणार?

विश्वनाथन यांनी मात्र जडेजा हा सीएसकेच्या प्रत्येक योजनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. सीएसकेने इन्स्टाग्राम हँडलवरून बुधवारी जडेजाला ‘अनफॉलो’ करताच जडेजा आणि सीएसकेत मतभेद झाल्याचे वृत्त चव्हाट्यावर आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 5:31 AM

Open in App

नवी दिल्ली : आयपीएल २०२२ मधून सीएसकेने रवींद्र जडेजा याला रिलिज केले. तो घरी परतला. फ्रॅन्चायजीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. बरगड्यांच्या दुखण्यामुळे जडेजा आयपीएलमधून बाहेर पडला होता. सीएसकेचे आठ गुण असून तीन सामने अद्याप शिल्लक आहेत.

 सीएसकेने इन्स्टाग्राम हँडलवरून बुधवारी जडेजाला ‘अनफॉलो’ करताच जडेजा आणि सीएसकेत मतभेद झाल्याचे वृत्त चव्हाट्यावर आले. खराब कामगिरीमुळे जडेजाने लीगच्या अर्ध्यात सीएसकेचे नेतृत्व सोडले. विश्वनाथन यांनी मतभेद नसल्याचे स्पष्ट केले तरी जडेजाच्या काही सहकाऱ्यांनी मतभेद असल्याचे संकेत दिले. नाव उघड न करण्याच्या अटीवर या खेळाडूंनी ज्या पद्धतीने नेतृत्व बदल करण्यात आला, त्यावर जडेजा समाधानी नव्हता. या प्रक्रियेत पारदर्शीपणाचा अभाव असल्याचे या अष्टपैलू खेळाडूला वाटते.

जडेजा सीएसकेच्या योजनेत सहभागी दुसरीकडे, विश्वनाथन यांनी मात्र जडेजा हा सीएसकेच्या प्रत्येक योजनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले.  ते म्हणाले,‘ सोशल मीडियावर मी काहीही फॉलो करीत नाही. तेथे काय सुरू आहे याची मला माहिती नसते. व्यवस्थापनाकडून काहीही अडचण नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो.  जडेजा हा सीएसकेच्या भविष्यातील योजनेत सहभागी असेल.’  जडेजाच्या दुखापतीबाबत विश्वनाथन म्हणाले, ‘आरसीबीविरुद्ध लढतीदरम्यान जडेजाला बरगड्यांची दुखापत झाली होती. त्यामुळे दिल्लीविरुद्ध तो खेळू शकला नव्हता. वैद्यकीय सल्ल्यानुसार तो आयपीएलमधील पुढील सामने खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले.  तो घरी परत जात असून आम्ही त्याला रिलिज केले आहे.’ वर्षभरापासून तो सज्ज नव्हता. आयपीएल सुरू होण्या आधीच धोनीचा उत्तराधिकारी म्हणून जडेजाकडे नेतृत्व सोपविण्यात आले. 

त्याला १६, तर धोनीला १२ कोटींत सीएसकेने रिटेन केले. सीएसकेला वाटायचे की, तो धोनीच्या अनुपस्थितीत भविष्यात सज्ज असेल. जडेजाने मैदानावर निर्णय घेताना धोनीकडून सल्ला घेण्यात संकोच बाळगला नाही; पण संघाची सतत हार आणि जडेजाचा खराब फॉर्म यांमुळे गणित बिघडले.  जडेजाने धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवली. खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी जडेजाने हा निर्णय घेतल्याचे कारण सीएसकेकडून देण्यात आले. धोनीने संघाच्या हितावह पुन्हा नेतृत्व स्वीकारण्यास मान्यता दिली.

पुढील सत्रात सीएसके सोडणार?     माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने जडेजाला वाईटपणे हाताळल्याचे मत व्यक्त केले.  तो म्हणाला,‘ माझ्या मते जडेजा २०२३ च्या सत्रात कदाचित सीएसकेसोबत नसेल. या संघात पडद्यामागे बऱ्यात हालचाली सुरू असतात. गेल्या मोसमात सुरेश रैनासोबत काय घडले, याकडे उदाहरण म्हणून पाहता येईल.     धोनीने सार्वजनिकरीत्या सांगितले की, नेतृत्वाचे ओझे जडेजाची कामगिरी खराब करीत आहे. ‘यंदा तो नेतृत्व करेल हे त्याला मागच्या सत्रापासूनच माहिती होते. मीदेखील त्याला स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याची मोकळीक दिली होती. कर्णधार या नात्याने फार जबाबदारी सांभाळावी लागते. हे ओझे त्याला पेलवता आलेले नाही. नेतृत्वाने त्याची तयारी आणि कामगिरी खालावली.’

टॅग्स :रवींद्र जडेजाआयपीएल २०२२
Open in App