Join us  

रवींद्र जडेजा सर्वाधिक उपयुक्त क्रिकेटपटू; विस्डेन मॅगझिनने केला गौरव

२००९ साली जडेजाने भारतीय संघात पदार्पण केले. तेव्हापासून ४९ कसोटी, १६५ वन-डे आणि ४९ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 12:03 AM

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विस्डेन मॅगझिनने जडेजाची २१ व्या शतकातील भारताचा सर्वोत्कृष्ट उपयुक्त क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे.

गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही प्रकारात जडेजा सर्वोत्तम कामगिरी करत असल्यामुळे त्याची या बहुमानासाठी निवड झाली. तिन्ही क्षेत्रात जडेजाच्या कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डेनने त्याचे नाव पुढे केले. ९७.३ गुण मिळवून जडेजाने हा मान मिळवला.‘क्रिकविज’च्या विश्लेषणानुसार जगातील प्रत्येक खेळाडूला सामन्यातील त्याच्या योगदानाच्या आधारे रेटिंग दिले जाते.रेटिंगमध्ये जडेजा जगातील दुसऱ्या स्थानाचा उपयुक्त खेळाडू ठरला असून अव्वल स्थानावर श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन विराजमान आहे.‘रवींद्र जडेजाची या स्थानासाठी निवड झाल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटू शकते. कसोटी क्रिकेटमध्ये संघाची निवड होते तेव्हा निवडकर्त्यांची कधीही प्रथम पसंती नसते. मात्र ज्या ज्या वेळी त्याला संधी मिळाली आहे, त्या सामन्यात त्याने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली, शिवाय सहाव्या स्थानावर आश्वासक फलंदाजीदेखील केली आहे.

त्याची गोलंदाजीतील सरासरी ही अनेक माजी दिग्गज गोलंदाजांच्या सरासरीहून सरस आहे. याशिवाय फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या निकषांमध्येही जडेजा फारच उत्कृष्ट ठरतो, असे मॅगझिनने म्हटले आहे. २००९ साली जडेजाने भारतीय संघात पदार्पण केले. तेव्हापासून ४९ कसोटी, १६५ वन-डे आणि ४९ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. १८६९ कसोटी धावा तसेच २१३ कसोटी बळी त्याच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळतो.‘भारतासाठी खेळणे स्वप्न होते. देशाचा सर्वांत उपयुक्त खेळाडू हा सन्मान मिळणे गौरवाची बाब आहे. यासाठी चाहते, सहकारी, कोचेस आणि सहयोगी स्टाफचा आभारी आहे. त्यांचे प्रेम आणि सहकार्य या बळावरच ही मजल गाठता आली.’ -रवींद्र जडेजा

 

टॅग्स :रवींद्र जडेजा