Join us  

रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा हंगाम तीन वेळा पुढे ढकलण्यात आला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 10:26 AM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत.  कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल) 13वा हंगाम तीन वेळा पुढे ढकलण्यात आला, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवरही अनिश्चितितचं सावट आहे. अशात क्रिकेटची पुढील वाटचाल कशी असावी, यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोखठोक मत मांडलं आहे. 

खेळाडूंसाठी मागील काही महिने भयाण स्वप्नासारखी होती, असं मत त्यांनी व्यक्त केले. क्रिकेट पुन्हा सुरू होण्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. ''गेल्यात सात किंवा आठ दशकात खेळाडूंच्या आयुष्यात असा प्रसंग आला नव्हता. जो आम्ही गेली दोन महिने आणि आणखी काही महिने अनुभवत आहोत. हे सर्व अकल्पनीय आहे,'' अशी प्रतिक्रिया शास्त्री यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.

कोरोना व्हायरसचं संकट असलं तरी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ठरलेल्या वेळापत्रकानुसार खेळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, शास्त्रींनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपेक्षा आयपीएलसह स्थानिक स्पर्धा आधी सुरू करावीत असे स्पष्ट मत मांडले आहेत. ''सद्यस्थितित जागतिक स्पर्धेचं आयोजन करण्यावर भर देणं चुकीचं ठरेल. घरीच राहा... स्थानिक स्पर्धा सुरू होण्याची प्रतीक्षा करायला हवी. आंतरराष्ट्रीय, प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना स्थानिक स्पर्धांमधून मैदानावर उतरूद्या. ती महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर द्विदेशीय मालिकेचा विचार करा. भारताला वर्ल्ड कप किंवा द्विदेशीय मालिका यापैकी एकाची निवड करायची असेल, तर मी द्विदेशीय मालिका निवडेन. 15 संघांना एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करायला लावणे, सोपी गोष्ट नाही. त्यापेक्षा द्विदेशीय मालिका खेळवणं सोयिस्कर ठरेल,'' असे ते म्हणाले.

स्थानिक स्पर्धा एक किंवा दोन शहरांमध्ये खेळवता येऊ शकते. द्विदेशीय मालिकेच्या बाबतितही असं केलं जाऊ शकतं. पण, वर्ल्ड कपमध्ये तसं करता येणार नाही. जगातील कानाकोपऱ्यातून खेळाडूंना प्रवास करावा लागेल. शास्त्री म्हणाले,''जेव्हा क्रिकेट परतेल तेव्हा आयपीएलला प्राधान्य दिले पाहिजे. आयपीएल एक किंवा दोन शहरांमध्ये खेळवली जाऊ शकते. द्विदेशीय मालिकेच्या बाबतीतही अस करणं शक्य आहे. देशांना त्यांच्या स्थानिक क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याची हीच योग्य संधी आहे.'' 

टॅग्स :रवी शास्त्रीआयपीएल 2020आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020