Join us  

सर्व विकेट्स फिरकीपटूंनीच काढल्या; पण जगातील सर्वोत्तम स्पिनरची झोळी राहिली रिकामी!

मुथय्या मुरलीधरन जगातील महान गोलंदाज... श्रीलंकेच्या या फिरकीपटूंना जगातल्या भल्याभल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं...

By स्वदेश घाणेकर | Published: January 07, 2020 11:54 AM

Open in App

मुथय्या मुरलीधरन जगातील महान गोलंदाज... श्रीलंकेच्या या फिरकीपटूंना जगातल्या भल्याभल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं... मुरलीधरनची गोलंदाजीची शैली अवाक् करणारी अन् फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारी... म्हणूनच जगात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मुरलीधरनने पटकावला आहे. 133 कसोटी सामन्यात त्यानं सर्वाधिक 800 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांविरुद्ध त्यानं विकेट्सचे शतक साजरे केले. पण, जगातील या सर्वोत्तम फिरकीपटूला एकदा एकही विकेट मिळाली नव्हती. विशेष म्हणजे त्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात प्रतिस्पर्धी संघाचे दहा फलंदाज फिरकीपटूंनी बाद केले होते. पण, त्या फिरकीपटूंमध्ये मुरलीधरनची झोळी रिकामीच राहिली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये मुरलीच्या नावावर 800 विकेट्स आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न ( 708), भारताचा अनिल कुंबळे ( 619), इंग्लंडचा जेम्स अँडरसन ( 583) आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राथ ( 563) हे अव्वल पाचात येतात. वन डे क्रिकेटमध्येही मुरलीच टॉप आहे. 350 वन डे सामन्यांत त्याच्या नावावर सर्वाधिक 534 विकेट्स आहेत. त्यानंतर अव्वल पाच गोलंदाजांत पाकिस्तानचा वासीम अक्रम ( 502) व वकार युनीस ( 416), श्रीलंकेचा चामिंडा वास ( 400), पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदी ( 395) आणि दक्षिण आफ्रिकेचा शॉन पॉलॉक ( 393) हे आहेत.

जगातल्या या महान गोलंदाजाची कसोटीच्या एका डावात विकेटची झोळी रिकामी राहिली होती. 1998 सालचा हा प्रसंग आहे. न्यूझीलंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आला होता आणि तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अशी दुर्मिळ घटना घडली होती. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचा पहिला डाव 193 गुंडाळत श्रीलंकेने पहिल्या डावात 323 धावा केल्या. लंकेने दुसऱ्या डावातही किवींचा डाव 114 धावांत गुंडाळला आणि ही कसोटी एक डाव व 16 धावानी जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.

या सामन्याच्या पहिल्या डावात किवींचे सर्वच्या सर्व दहा फलंदाज फिरकीपटूंनी बाद केले होते. त्या डावात मुरलीनं 23 षटकं टाकली, परंतु त्याला एकही विकेट मिळाली नाही. क्रिकेटच्या इतिहासात असे प्रथमच घडले असेल की, फिरकीपटूंनी संपूर्ण संघ बाद केला, परंतु मुरलीची झोळी रिकामी राहिली. लंकेच्या कुमार धर्मसेनानं 24.1 षटकांत 72 धावांत 6 विकेट्स घेतल्या. निरोशान बंदारातिल्लेकेनं 38 षटकांत 47 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. मुरलीनं 23 षटकांत 33 धावा दिल्या. 

दुसऱ्या डावात मुरलीनं 24 धावांत 3 विकेट्स घेतल्या. बंदारातिल्लेकेनं 36 धावांत किवींचा निम्मा संघ माघारी पाठवला.

कसोटीतील 'असा' विक्रम जो पाकिस्तानी खेळाडूनं रचला; पण ५८ वर्षांनी धोनीनं केली किमया!

टॅग्स :श्रीलंकान्यूझीलंडअनिल कुंबळे