Ranji Trophy Prithvi Shaw Duck As Maharashtra Suffer Horror Start vs Kerala : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉ च्या पदरी भोपळा पडला. सराव सामन्यात मुंबई संघाविरुद्ध पृथ्वी शॉनं १८१ धावा केल्या होत्या. या सामन्यात पृथ्वीनं मुंबईचा अष्टपैलू मुशीर खान याच्यावर बॅट उगारल्याचे प्रकरणही गाजले होते. त्यामुळे एकंदरीत पहिल्या सामन्यात पृथ्वीवर सर्वांच्या नजरा होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महाराष्ट्र संघानं खाते उघडण्याआधी ३ चेंडूत गमावल्या ३ विकेट्स, त्यात पृथ्वीचा पहिला नंबर
केरळ विरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पृथ्वी शॉ आणि अर्शिन कुलकर्णी यांनी संघाच्या डावाची सुरुवात केली. पण पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर एम. डी. निधीश याने पृथ्वीला पायचित करत तंबूचा रस्ता दाखवला. तो शून्यावर बाद झाल्यावर महाराष्ट्राच्या ताफ्यातील तिघे पाठोपाठ खाते न उघडता बाद झाले. एवढेच नाही तर कर्णधार अंकित बावणेला खाते उघडता आले नाही.
चौघांच्या पदरी भोपळा; १८ धावांत महाराष्ट्राचा अर्धा संघ तंबूत
पृथ्वी शॉ बाद झाल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या सिद्धेश वीर याला निधीश याने आल्या पावली माघारी धाडले. त्याच्यावर गोल्डन डकची नामुष्की ओढावली. महाराष्ट्राच्या संघाने पहिल्या षटकात एकही धाव न करता दोन विकेट गमावल्या. दुसऱ्या षटकात अर्शिन कुलकर्णी स्ट्राइकवर आला अन् त्याच्यावरही 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली. नेडुमान्कुझही बेझील मोहम्मद अझरुद्दीन याच्याकरवी त्याला झेलबाद केले. आघाडीच्या तीन फलंदाजांशिवाय महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणे ७ चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. महाराष्ट्र संघाने अवघ्या ५ धावांवर चौथी विकेट गमावली. महाराष्ट्राच्या धावफलकावर १८ धावा असताना सौरभ नवलेच्या रुपात निधीश याने महाराष्ट्र संघाला आणखी एक धक्का देत १८ धावांवर अर्धा संघ तंबूत धाडल्याचे पाहायला मिळाले.