राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय

सीएसके १६ धावांनी पराभूत; सॅमसन, स्मिथ, आर्चर यांची फटकेबाजी निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 05:01 AM2020-09-23T05:01:07+5:302020-09-23T05:05:01+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan's 'Royal' victory over Chennai | राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय

राजस्थानचा चेन्नईवर ‘रॉयल’ विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजाह : राजस्थान रॉयल्सने दिलेल्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्जचा १६ धावांनी पराभव झाला. राजस्थानने २० षटकांत ७ बाद २१६ धावा उभारल्यानंतर चेन्नईला ६ बाद २०० धावांचीच मजल मारता आली.


सलामीला मुंबई इंडियन्सला नमवून दिमाखात सुरुवात केलेल्या चेन्नईची हवा राजस्थानने काढली. राहुल तेवटीयाने ३ बळी घेत चेन्नईचे कंबरडे मोडले. जोफ्रा आर्चरने वादळी फटकेबाजीनंतर टिच्चून गोलंदाजी करत चेन्नईला फटकेबाजीपासून दूर ठेवले. फाफ डूप्लेसिसने ३७ चेंडूत ७२ धावांची झंझावाती खेळी करत चेन्नईच्या आशा कायम ठेवल्या होत्या. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरच्या षटकांत टॉम कुरणला ठोकलेले सलग तीन षटकारही चेन्नईचा पराभव टाळू शकले नाही.
तत्पूर्वी, संजू सॅमसन, कर्णधार स्टीव्ह स्मिथ व आर्चर यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर राजस्थानने धावांचा एव्हरेस्ट उभारला. सॅमसन आणि स्मिथ यांनी दमदार अर्धशतकांसह राजस्थानला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवले. परंतु, आर्चरने २०व्या षटकात लुंगी एनगिडीला सलग चार षटकार ठोकले. यातील दोन चेंडू नो बॉल होते. त्यामुळे राजस्थानला एकप्रकारे लॉटरीच लागली. सॅम कुरनने ३ बळी घेत राजस्थानला रोखण्याचा प्रयत्न केला. राजस्थाने तब्बल १७ षटकार ठोकले. यापैकी ९ षटकार एकट्या सॅमसनने, तर स्मिथ व आर्चर यांनी प्रत्येकी ४ षटकार ठोकले.


सुमार पंचगिरी
टॉम कुरेनविरुद्ध दिल्या गेलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा सुमार पंचगिरी चव्हाट्यावर आली. चाहरच्या एका चेंडूवर धोनीने झेलचितची अपील केल्यानंतर कुरेने तंबूत परतत होता, पण दोन्ही पंचांनी चर्चा करीत त्याला थांबविले. निर्णय तिसऱ्या पंचावर सोपविण्यात आला. त्यात चेंडू पॅडला लागून गेल्यानंतर धोनीने टिपला असल्याचे स्पष्ट झाले.


आर्चरची षटकारांची बरसात
२० व्या षटकात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने आक्रमक फलंदाजी करताना लुंगी एनगिडीच्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले आणि संघाला दोनशेचा पल्ला ओलांडून दिला. एनगिडीचा चौथा चेंडू नोबॉल होता. त्यासाठी फ्री हिट बहाल करण्यात आली. त्यावर सलग चौथा षटकार ठोकला. एनगिडीचे हे षटक ९ चेंडूंचे होते. त्यात २७ धावा फटकावल्या गेल्या.

 

 

Web Title: Rajasthan's 'Royal' victory over Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.