Join us  

राजस्थान रॉयल्स आयपीएल खेळण्यास उत्सुक; केवळ भारतीय खेळाडूंचा समावेश

कोरोनामुळे जगातील सर्वच क्रीडा आयोजन एकतर स्थगित करण्यात आले किंवा रद्द झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 12:25 AM

Open in App

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रकोप असल्याने क्रीडा विश्वावर मोठे संकट ओढवले आहे. या संकटाच्या काळातही राजस्थान रॉयल्स कुठल्याही स्थितीत यंदा आयपीएल खेळण्याच्या बाजूने आहे. केवळ भारतीय खेळाडूंचा समावेश असलेली आणि कमी कालावधीची आयपीएल खेळण्याची तयारी राजस्थान रॉयल्सचे सीईओ रंजीत बडठाकूर यांनी दाखवली आहे. तथापि १३ व्या पर्र्वाचे भविष्य १५ एप्रिलपूर्वी निश्चित होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुळे जगातील सर्वच क्रीडा आयोजन एकतर स्थगित करण्यात आले किंवा रद्द झाले आहे. बीसीसीआयने अद्याप आयपीएलच्या भविष्याचा निर्णय घेतलेला नाही. विदेशी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी असल्यामुळे लीगचे आयोजन केवळ १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. निर्धारित वेळापत्रकानुसार २९ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार होती.

वृत्तसंस्थेशी बोलताना बडठाकूर म्हणाले, ‘आम्ही केवळ भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या लहान आकाराच्या आयपीएलसाठी देखील तयार आहोत. अखेर ही इंडियन प्रीमियर लीग असणारच आहे. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशात सध्या ‘लॉकडाऊन’ आहे. सध्यस्थिती पाहता यंदा आयपीएल होण्याची शक्यता देखील कमीच वाटत आहे.’

बीसीसीआय मात्र काही द्विपक्षीय मालिकांवर पाणी फेरुन यावर्षाअखेर आयपीएल आयोजनाचा पर्याय देण्याच्या तयारीत असल्याचे कळते. बीसीसीआय संघ मालकांचे सर्वोत्तम हित लक्षात ठेऊन निर्णय घेईल, अशी अपेक्षा बडठाकूर यांनी व्यक्त केली.

‘स्पर्धेचे आयोजन कधी व्हावे हे बीसीसीआयला निश्चित करायचे आहे. असा कुठलाही निर्णय १५ एप्रिलनंतरच होईल,’ असे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. आयपीएलचे १३ वे सत्र रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. सोबतच सर्व संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावे लागू शकते. स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंनाही फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी काळात बीसीसीआय आयपीएलबद्दल काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (वृत्तसंस्था)कोरोना व्हायरसमुळे जगभरात बुधवारपर्यंत ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला असून ८ लाख ५० हजार लोक कोरोनाबाधित आहेत. भारतात १६०० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर ४४ लोक आतापर्यंत दगावले आहेत. (वृत्तसंस्था)

‘प्रतिभावान खेळाडूंची फळी उपलब्ध’

‘ही कठीण वेळ असून स्थिती सुधारल्यानंतर बीसीसीआयने स्वत:कडून सर्वोत्कृष्ट प्रयत्न करायला हवे. आधी आम्ही केवळ भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या आयपीएलच्या आयोजनाबद्दल विचार करू शकत नव्हतो, मात्र आता भारतातच अनेक प्रतिभावान खेळाडूंची फळी उपलब्ध असल्यामुळे असा विचार करायला हरकत नाही. आयपीएल न होण्यापेक्षा केवळ भारतीयांंचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या आयोजनात गैर काहीही नाही,’असे रंजीत बडठाकूर यांचे मत आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआयपीएल 2020