जयपूर: राजस्थान रॉयल्स संघ सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आयपीएलमध्ये विजयी लय कायम राखण्यासाठी खेळणार आहे. सवाई मानसिंग स्टेडियमवरील आव्हानाचा राजस्थानला अंदाज आहेच. दुसरीकडे सनरयजर्सने किंग्स पंजाबला नमवून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
हैदराबादने सातपैकी पाच सामने जिंकले तर राजस्थान तीन विजय आणि तीन पराभवांसह पाचव्या स्थानावर आहे. राजस्थानने कृष्णप्पा गौतमच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर मागच्या रविवारी मुंबईला तीन गड्यांनी पराभूत केले. कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात संजू सॅमसनसारखा आत्मविश्वासाने खेळणारा फलंदाज असून बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांचाही आधार आहे. गोलंदाजीची भिस्त मध्यम जलद धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, बेन लॉघलिन आणि गौतम यांच्यावर असेल. हैदराबाद संघ डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीतही तगडा वाटतो. या संघाने पहिल्या सामन्यात राजस्थानला नऊ गड्यांनी पराभूत केले होते.
शिखर धवन किंग्स पंजाबविरुद्ध खेळला नव्हता. राजस्थानविरुद्ध तो मोठी खेळी करण्याच्या तयारीत असेल.
केन विलियम्सन आणि मनीष पांडे हे धावांचा पाऊस पाडण्यात तरबेज मानले जातात. दीपक हूड्डा आणि युसूफ पठाण हे देखील मदतीला आहेतच. (वृत्तसंस्था)