Join us  

राजस्थानची फलंदाजी अडखळली, चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सुरू असलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचे आव्हान ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 9:39 PM

Open in App

जयपूर - आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सुरू असलेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने चेन्नई समोर विजयासाठी 152 धावांचे आव्हान ठेवले आहे. दमदार सुरुवातीनंतर चेन्नईच्या भेदक माऱ्यासमोर मधली फळी कोलमडल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्याचे राजस्थानचे स्वप्न भंगले. चेन्नईने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित  केले. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी राजस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र रहाणे (14) आणि जोस बटलर (23) धावा काढून बाद झाल्यानंतर राजस्थानच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतील संजू सॅमसन (6), राहुल त्रिपाठी (10) आणि स्टीव्हन स्मिथ (15) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.

 त्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्सने रियान परागच्या साथीने राजस्थानला शंभरीपार पोहोचवले. पण अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या नादात रियान पराग (16) आणि बेन स्टोक्स (28) बाद झाले. शेवटी श्रेयस गोपाळ ( नाबाद 19) आणि जोफ्रा आर्चर ( नाबाद 13) यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. चेन्नईकडून रवींद्र जडेजा, दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन तर मिचेल सेंटनरले एक बळी टिपला. दरम्यान, रवींद्र जडेजाने आयपीएलमधील आपले बळींचे शतकही पूर्ण केले. 

 

टॅग्स :आयपीएल 2019राजस्थान रॉयल्सचेन्नई सुपर किंग्स