- हर्षा भोगले लिहितात...
आयपीएलच्या आधारे साधारणत: दीर्घकालीन स्पर्धेत कुठल्याही खेळाडूच्या कामगिरीचे आकलन कठीण असते. तरीही लोकेश राहुल आणि उमेश यादव यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
भारत हा फलंदाजांना पुजणारा देश असल्याने मी लोकेश राहुलपासून सुरुवात करेन. त्याचे व्हिजिटिंग कार्ड बनवायचे झाल्यास मी त्यावर केएल राहुल, क्लास!! इतकेच लिहणार. राहुल देशासाठी प्रत्येक सामन्यात का खेळत नाही, हे सांगताना मला फार त्रास होतो. पण हा प्रश्न मला अधिक काळ विचलित करू शकणार नाही. तो फटकेबाजीत तरबेज आहे. षटकार मारतो तेव्हादेखील नियंत्रण ढळू देत नाही. वेगवान माऱ्यावर तो तुटून पडतो आणि फिरकीलाही तितकाच समर्थपणे खेळतो. मुंबईविरुद्ध त्याने मारलेले दोन स्क्वेअर कट मी वारंवार रिप्लेत पाहिले. त्याच्यावर आता कितीही स्तुतिसुमने उधळली गेली तरी विनम्र तसेच महत्त्वाकांक्षीपणा कायम राखण्याची गरज आहे.
दुसरा खेळाडू वेगवान गोलंदाज उमेश यादव आहे. तो अनेकदा शानदार मारा करतो. सात वर्षांपूर्वी भेदक मारा करीत लक्ष वेधणाºया उमेशला अद्यापही योग्य व्यासपीठ मिळालेले नाही. आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना त्याला पाहणे सुखद आहे. वेगवान आणि स्ंिवग मारा करीत फलंदाजांना तो लवकर जाळ्यात ओढतो. मी डेथ ओव्हरमधील त्याच्या अधिक धावा मोजण्याबद्दलही चिंतेत नाही. कारण ‘बळी घेणारा गोलंदाज’ म्हणून त्याची ओळख निर्माण होणे अधिक महत्त्वपूर्ण आहे. उमेशने फिटनेस आणि फॉर्म टिकविल्यास कसोटीत त्याचे स्विंग चेंडू पाहणे उत्सुकतेचे ठरेल. जोहान्सबर्ग येथे द. आफ्रिकेविरुद्ध मात्र भारतीय संघातील चार वेगवान गोलंदाजांमध्ये त्याला स्थान देण्यात आले नव्हते. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर त्याने पुन्हा एकदा दावेदारी सिद्ध केली आहे. वेगवान गोलंदाजांचा मोठा लॉट येताना दिसत नाही. असे गोलंदाज आल्यास सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ते भारतीय कसोटी संघात स्थान मिळवू शकतील. (टीसीएम)