Join us  

जोफ्रा आर्चरला वर्णद्वेषी शिविगाळ; विंडीजविरुद्ध तिसऱ्या कसोटीबाहेर राहण्याची शक्यता

काही जणांनी तर आर्चरवर वर्णद्वेषी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:10 PM

Open in App

लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला चाहत्यांनी शिवीगाळ केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्यावर वर्णद्वेषी टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे आर्चर हा त्रस्त असून खुद्द आर्चरने याबाबत खुलासा केला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी आटोपल्यानंतर आर्चर हा गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी मॅन्चेस्टर येथून दोन तासावर असलेल्या ब्रिगटेन येथे तिच्या घरी गेला होता. त्यामुळे जैव सुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी त्याला एका सामन्यातून बाहेर काढले होते. आता चाहत्यांनी त्याच्यावर ऑनलाईन शिवीगाळ करायला सुरुवात केली आहे.

काही जणांनी तर आर्चरवर वर्णद्वेषी टीकाही केल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत आर्चर म्हणाला,‘सध्याच्या काळ माझ्यासाठी बिकट आहे. मला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नाही. पण दुसरीकडे चाहत्यांनी मला आॅनलाईन शिवीगाळ करायला सुरुवात केली. काही जणांनी तर वर्णद्वेषी टीकाही केली. मी त्रस्त झालो आहे. याबाबतची सर्व माहिती ईसीबीला दिली आहे. बोर्ड यातून मार्ग काढेल, असा विश्वास वाटतो.’

ओल्ड ट्रॅफोर्ड येथील हॉटेलमध्ये पाच दिवस विलगीकरणात राहिलेल्या आर्चरच्या दोन कोरोना चाचण्या झाल्या. दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह येताच मंगळवारी आर्चरचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

कसोटीतून बाहेर?

बार्बाडोस येथे जन्मलेला २५ वर्षांचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा जैव सुरक्षेचा नियमभंग केल्याने दुसºया कसोटीस मुकला होता. या काळात वर्णद्वेषी शिव्यांचा भडीमार होत असल्याचा खुलासा करीत ईसीबीलादेखील माहिती दिली. दरम्यान आर्चरला विंडीजविरुद्ध तिसºया कसोटीतून वगळले जाईल, असे संकेत मिळाले आहेत.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिजइंग्लंड