Join us

इडनवर रसेलविरुद्ध रबाडा ‘युद्ध’ गाजणार

केकेआर- दिल्ली लढतीत गांगुलीचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 05:13 IST

Open in App

कोलकाता : स्फोटक आंद्रे रसेलची फटकेबाजी आणि कासिगो रबाडाचे अचूक व भेदक यॉर्कर चेंडू पाहण्यास उत्सुक असलेल्या इडनवरील प्रेक्षकांच्या नजरा शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लढतीत माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या भूमिकेकडे लागलेल्या असतील.

बंगाल क्रिकेट संघटनेचा (कॅब) अध्यक्ष असलेला सौरव सध्या आयपीएलमध्ये कॅपिटल्सच्या सल्लागाराची भूमिका बजावत असल्याने त्याला आपल्या जुन्या संघाविरुद्ध काही निर्णय घेणे भाग पडेल. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये तो कुठे बसतो, हे पाहणे उत्कंठापूर्ण ठरणार आहे. यासंदर्भात गांगुलीवर ‘दुटप्पी भूमिकेचे’ आरोपही लावण्यात आले आहेत.

सहा सामन्यात ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या केकेआरकडून रसेलची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्याने पाच डावात २५७ धावा केल्या. त्यापैकी १५० धावा केवळ षटकारांच्या आहेत. त्याला रोखायचे कसे, हे प्रतिस्पर्धी संघासाठी कोडे असते. चेन्नईचा कर्णधार धोनीने मागच्या सामन्यात त्याच्याविरुद्ध फिरकीचा वापर करीत घरच्या मैदानावर सात गड्यांनी सामना जिंकला. केकेआरचा यंदा पहिला पराभव दिल्लीकडूनच झाला. दिल्लीने ‘सुपर ओव्हरमध्ये’ बाजी मारली होती. त्यात रसेलवर रबाडाने बाजी मारली होती. रबाडाने ‘सुपरओव्हर’मध्ये ११ धावांचा बचाव केला. रसेलने पहिल्या चेंडूवर चौकार मारला, पण रबाडाने पुढील चेंडू यॉर्कर टाकून त्याची दांडी गूल केली. त्यामुळेच केकेआर घरच्या मैदानावार त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास उत्सुक असेल.

दुसरीकडे कॅपिटल्सचे सहा सामन्यात सहा गुण आहेत. या सामन्यात केकेआरच्या चाहत्यांना पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. तथापि खेळपट्टी निर्णायक भूमिका बजावू शकते. दिल्लीकडे दर्जेदार गोलंदाज असल्याने संघ निवडीत गांगुलीचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरू शकतो. गांगुलीने मात्र खेळपट्टी कशी साथ देईल, हे सामन्याच्या दिवशी कळेल असे सांगून जो संघ उत्तम कामगिरी करेल, तो विजयी होईल, असे म्हटले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयपीएल 2019