कराची : कोरोनामुळे आॅस्ट्रेलियात प्रस्तावित असलेल्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन रद्द झाले आणि त्याचवेळी आयपीएलचे आयोजन होणार असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होतील,असा सूचक इशारा पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने सोमवारी दिला. १८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित विश्वचषकाबाबत आयसीसीने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
स्वत:च्या यूट्यूब चॅनलवर इंझमाम म्हणाला, ‘विश्वचषकाच्या तारखांचा अडथळा आयपीएल तसेच भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेत येत असल्याने विश्वचषक रद्द करण्याचा कुटील डाव रचणे सुरू असल्याची चर्चा ऐकायला मिळते.’ कोरोनामुळे विश्वचषकाचे आयोजन करता येणार नाही अशी भूमिका आॅस्ट्रेलिया बोर्डाने घेतल्यास ते मान्य करण्यासारखे आहे. पण त्याचवेळी आयपीएलसारखी दुसरी मोठी स्पर्धा खेळविली जात असेल तर नक्कीच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. खासगी स्पर्धांना प्राधान्य देऊ नये,’ अशा शब्दात त्याने खदखद व्यक्त केली. सूत्रांनुसार टी-२० विश्वचषक रद्द केला जाणार आहे. १८ संघांतील खेळाडूंची सोय करणे खूप कठीण असल्याने आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड माघार घेण्याची शक्यता आहे. सध्या पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये आहे आणि त्यांना सर्व आवश्यक त्या सुखसोयी पुरवल्या जात आहेत.