Join us  

शिखर धवनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह, केदार जाधवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड 

थंडगार वातावरणात सकाळी ११.३० पासून सामन्याला सुरुवात होणार आहे. येथील खेळपट्टी उसळी घेणारी असल्याने नाणेफेकीचा कौलही मोलाचा ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 8:09 AM

Open in App

धर्मशाला - भारत-श्रीलंकादरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. धर्मशालामध्ये दोन्ही संघात पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. विस्फोटक ओपनर शिखर धवनच्या खेळण्याबात प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, शिखर धवनचे अंग तापाने फणफणत आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात शिखरच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  शिखरच्या अनुपस्थित रोहित शर्मासोबत मुंबईकर अजिंक्य रहाणे सलामीला येऊ शकतो.  

केदार जाधवच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड - भारताचा फलंदाज केदार जाधवला दुखापतीमुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील वनडे मालिकेला मुकावे लागणार आहे. भारतीय संघात केदार ऐवजी तामिळनाडूचा नवोदित खेळाडू वॉशिंग्टन सुंदरची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेली आहे.  केदारला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वनडे मालिका खेळू शकत नाही.  भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला या वनडे आणि टी २० मालिकेसाठी विश्रांती दिल्याने रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. रोहितने केदार विषयी बोलताना सांगितले की केदार बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत आधीच झालेल्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी गेला होता परंतु त्याची ही दुखापत पूर्ण बरी होऊ शकली नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याचा बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलेल्या वॉशिंग्टन सुंदरची या आधीच श्रीलंका विरुद्धच्या टी २० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातून खेळला आहे. या संघातून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.

थंडगार वातावरणात सकाळी ११.३० पासून सामन्याला सुरुवात होणार आहे. येथील खेळपट्टी उसळी घेणारी असल्याने नाणेफेकीचा कौलही मोलाचा ठरेल. सलग पाच द्विपक्षीय मालिका जिंकणारा भारतीय संघ ही मालिका ३-० ने जिंकल्यास द. आफ्रिकेला मागे सारून वन-डेतही अव्वल स्थानावर विराजमान होईल. मागच्या वन-डे मालिकेत भारताने लंकेला ५-० असे नमविले होते. विराटच्या अनुपस्थितीत रोहित, रहाणे, कार्तिक, धोनी, केदार जाधव हे फलंदाजीत योगदान देण्यास सज्ज आहेत.

टॅग्स :क्रिकेटशिखर धवनश्रीलंकारोहित शर्मा